सदा सर्वकाळ लोकांना तुम्ही फसवू शकत नाही

By admin | Published: February 7, 2017 05:45 AM2017-02-07T05:45:55+5:302017-02-07T05:45:55+5:30

लोकांची दिशाभूल करणे मोदी सरकारला उत्तम जमते. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या. त्यातून निष्पन्न काय झाले?

You can not fool people forever | सदा सर्वकाळ लोकांना तुम्ही फसवू शकत नाही

सदा सर्वकाळ लोकांना तुम्ही फसवू शकत नाही

Next

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
लोकांची दिशाभूल करणे मोदी सरकारला उत्तम जमते. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या. त्यातून निष्पन्न काय झाले? नोटाबंदीच्या निर्णयानंतर किती काळा पैसा हाती आला? किती बनावट नोटा पकडल्या गेल्या? याची उत्तरे ना सरकारकडे आहेत ना रिझर्व बँकेकडे, असे सांगत आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक मुद्द्याचा आधार घेत, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवली. मंगळवारी लोकसभेत व त्यानंतर राज्यसभेत चर्चेचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या आरोप व टीकांना उत्तरे देतील.
सदासर्वकाळ सर्व लोकांना मूर्ख बनवणे शक्य होणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय पूर्वतयारीविना राबवला. कोट्यवधी लोकांना त्याचा छळ सोसावा लागला. १२५ पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याबद्दल साधी दिलगिरीही हे सरकार व्यक्त करायला तयार नाही. रिझर्व्ह बँकेला गाफील ठेवूनपंतप्रधानांनी ८६ टक्के चलनाला कागदाचे तुकडे बनवले. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयाची कल्पना रिझर्व बँकेच्या फक्त दोन संचालकांना केवळ एक दिवस आधी देण्यात आली. महत्त्वपूर्ण संस्थांचे हे अवमूल्यनच नाही काय?
‘प्रेम माझ्यावर आणि विवाह मात्र दुसऱ्याशी’ अशी मोदी सरकारची वृत्ती आहे, या खरगेंच्या या वाक्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदींनाही हसू आवरले नाही. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, अनुराग ठाकुर, निशिकांत दुबेंसह बहुतांश सत्ताधारी खासदारांनी खरगेंच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणला मात्र त्यांना दाद न देता खडगेंनी जवळपास ७0 मिनिटे सरकारची हजेरी घेतली.
अभिभाषणावरील आभार प्रस्तावाची सुरुवात पर्यटनमंत्री महेश शर्मांनी केला. ते म्हणाले की, भारताचे भविष्य बदलण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय सरकारने घेतला. काळया पैशांवर इतका मोठा प्रहार यापूर्वी देशात कोणीही केला नव्हता. पाकव्याप्त काश्मीरमधे सर्जिकल स्ट्राईक करण्यासह अनेक साहसी पाऊ ले सरकारने उचलली. असे निर्णय घ्यायला ५६ इंचाची छाती लागते. दोन वर्षांत ११ हजार गावांमधे वीज पोहोचली. जनधन खाती उघडून देशातल्या २७ कोटी लोकांना बँकिंग सिस्टिमचा भाग बनवले. संरक्षण व्यवस्थेत वन रँक वन पेन्शन प्रत्यक्ष लागू करण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवली.
भाजपचे वीरेंद्रसिंग म्हणाले, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा बराच गवगवा सुरू आहे. प्रत्यक्षात असे घडले असते तर रब्बीच्या सर्व पिकांचे क्षेत्र यंदा वाढलेच नसते. राहुल गांधी आणि अखिलेश यादवांचे नाव न घेता दोघांच्या रोड शोची खिल्ली त्यांनी उडवली. तृणमूलच्या सौगत राय यांनीही सरकारच्या विविध निर्णयांवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आज सुरुवात झाली.

Web Title: You can not fool people forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.