चिन्नम्मा : कैदी नं. ९४३५
By admin | Published: February 16, 2017 05:19 AM2017-02-16T05:19:51+5:302017-02-16T05:19:51+5:30
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंग पावलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला अखेर भ्रष्टाचाराबद्दल झालेली शिक्षा
बंगळुरू/चेन्नई/नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंग पावलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला अखेर भ्रष्टाचाराबद्दल झालेली शिक्षा भोगण्यासाठी बुधवारी सायंकाळी तुरुंगात गेल्या. त्या कैदी नंबर ९४३५ असतील. वातानुकूलित खोली द्यावी तसेच घरचे जेवण आणि बाटलीबंद पाणी, अशी मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यांना साध्या कैदी म्हणून अन्य दोन महिलांसह एका बराकीत पुढील काळ घालवावा लागणार आहे. तसेच इतर कैद्यांना दिले जाणारे जेवणच त्यांनाही मिळेल.
शशिकला यांनी नेमलेले विधिमंडळ पक्षाचे नेते एडापडी पलानीस्वामी यांच्या सरकार स्थापनेच्या दाव्यावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी निर्णय न घेतल्याने तामिळनाडूमधील राजकीय अस्थिरता कायमच आहे. चार वर्षांपैकी राहिलेला कारावास भोगण्यास शशिकला यांनी तत्काळ बंगळुरू येथील न्यायालयात हजर व्हावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला होता.
परंतु न्यायालयीन निकालाची प्रत मिळाली नाही, अशी सबब सांगत त्यांनी तो दिवस ढकलला. बुधवारी सकाळी त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील केटीएस तुलसी खंडपीठापुढे उभे राहिले व शशिकला यांना ‘आवराआवर’ करण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा, अशी त्यांनी विनंती केली. परंतु ‘यावर आम्ही काही आदेश देणार नाही. दिलेल्या निकालात कोणताही बदल करण्याचा आमचा विचार नाही,’ असे सांगून न्या. पी. सी. घोष व न्या. अमिताव रॉय यांनी त्यास ठाम नकार दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजकीय ‘तीर्थयात्रा’-
बंगळुरूला रवाना होण्याआधी त्यांनी अण्णा द्रमुक पक्षाचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन व त्यांच्या वारस आणि स्वत:च्या ‘गॉडमदर’ जयललिता यांच्या स्मारकांची ‘तीर्थयात्रा’ केली. मरिना बीचवरील जयललिता यांच्या समाधीपाशी पुष्पांजली वाहताना त्यांनी अश्रूंना मुक्त वाट करून दिली.
बंगळुरूमध्ये यांच्या ‘शरण’ येण्याची कायदेशीर औपचारिकता न्यायालयात पार पाडणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शक्य नाही हे लक्षात घेऊन न्यायालयच पराप्पणा अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात भरविण्यात आले.
सरकारी पाहुणे म्हणून शशिकला, इलावरसी आणि सुधाकरन या तिघांची कोठडीत रवानगी करण्यात आली. अपिलाच्या काळात ३३ दिवस कारावास भोगून झाला असल्याने शशिकला यांचा मुक्काम पुढील तीन वर्षे ११ महिने बंगळुरूच्या या तुरुंगात असेल.
रोज ५0 रुपये
शशिकला यांना कारागृहात रोज मेणबत्त्या व उदबत्त्या तयार करण्याचे काम देण्यात येणार असून, त्यासाठी त्यांना रोज ५0 रुपये पगार मिळेल. त्यांना रविवारीही सुटी नसेल. कारागृहात नेसण्यासाठी त्यांना प्रशासनातर्फे तीन सुती साड्या देण्यात आल्या आहेत. अन्य कैद्यांप्रमाणेच त्यांना तुरुंगात वागणूक मिळेल आणि व्हीआयपी म्हणून वागविले जाणार नाही.