'आज सामना होणार', शहीद मेजर सतीश दाहियांचे शेवटचे शब्द
By admin | Published: February 17, 2017 10:37 AM2017-02-17T10:37:43+5:302017-02-17T10:51:42+5:30
शहीद मेजर सतीश दाहिया यांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याआधी आपल्या सहकारी सबीर खानला 'आज सामना होणार' असं म्हटलं होतं
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17 - मगंळवारी काश्मीरच्या हंदवाडा येथे शहीद झालेल्या शूरवीर मेजर सतीश दाहिया यांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याआधी आपल्या सहकारी सबीर खानला 'आज सामना होणार' असं म्हटलं होतं. हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर सतीश दाहिया शहिद झाले.
सबीर खान हंदवाडा पोलिस खात्यात उप विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हंदवाडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सबीर खानदेखील सहभागी झाले होते. सबीर खान यांनी सांगितलं की, 'सतीश दाहिया सुरुवातील चकमकीत सहभागी नव्हते. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी निघत असताना काही वेळापुर्वीच माझ्या विनंतीला मान देऊन त्यांच्यावर टीमचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. जेव्हा आम्ही दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी निघालो तेव्हा सतीश मला बोलले 'आज सामना होणार'. मी हसत हसत त्यांना खरंच का ? असं विचारलं, तर त्यावर विश्वास ठेव असं ते म्हणाले'.
आपल्या मित्राची शूरगाथा सांगताना भावूक झालेल्या सबीर खान यांनी सांगितलं की, 'हा आमचा शेवटचा संवाद ठरला. हा विश्वासच आहे ज्याच्या भरवशावर आपला तिरंगा मानाने फडकत आहे'. सबीर खान यांनी सतीशच्या काही आठवणीही सांगितल्या. 'गेल्याच महिन्यात आमच्या एका मित्राला वीरचक्र मिळालं. त्यावेळी आम्ही सर्व मित्र आनंद साजरा करत होतो. त्यावेळी सतीशने पुढच्या महिन्यात मी तुझ्यापेक्षा मोठं पदक मिळवेन असं म्हटलं होतं', अशी आठवण सबीर खान यांनी सांगितली.
'खरोखरच सतीशने आपलं म्हणणं खरं केलं. त्याने सर्वात मोठं पदक मिळवलं. सोबतच कोटी भारतीयांच्या ह्रदयात स्वताची जागा निर्माण केली आहे', असं सबीर खान म्हणतात. आपल्या मित्राला शेवटचा निरोप देत असताना 'आकाशात माझ्या आवडत्या ता-यात तुला पाहिन', असं सांगत शहीद सतीश आपल्यासोबत नेहमी असेल असं म्हटलं आहे.