अभाविपविरुद्ध बोलणाऱ्या तरुणीला बलात्काराची धमकी

By admin | Published: February 28, 2017 04:22 AM2017-02-28T04:22:56+5:302017-02-28T04:22:56+5:30

भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध मोहीम छेडणाऱ्या गुरमेहर कौरला बलात्काराची धमकी देण्यात आल्यामुळे दिल्ली विद्यापीठातील (डीयू) वाद चिघळला आहे.

Rape threat to a girl who speaks against ABVP | अभाविपविरुद्ध बोलणाऱ्या तरुणीला बलात्काराची धमकी

अभाविपविरुद्ध बोलणाऱ्या तरुणीला बलात्काराची धमकी

Next


नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध मोहीम छेडणाऱ्या गुरमेहर कौरला बलात्काराची धमकी देण्यात आल्यामुळे दिल्ली विद्यापीठातील (डीयू) वाद चिघळला आहे. भाजपा नेत्यांनी गुरमेहरला लक्ष्य केल्यानंतर विरोधी नेते तिच्या बचावासाठी धावले आहेत, तर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेण रिजिजू यांनी गुरमेहरचे मन कोणी प्रदूषित केले, असा सवाल केला, तर काही भाजपा नेत्यांनी या तरुणीपेक्षा दाऊद इब्राहिम बरा, या पातळीवर जात टीका केली.
अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. डीयूत शिकत असलेली गुरमेहर कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मंदीपसिंग यांची मुलगी आहे. दरम्यान, गुरमेहरने तक्रार दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
गेल्या बुधवारी डीयूमध्ये उमर खालीद आणि शहला रशीद यांना बोलावले होते. त्यातून अभाविप व एआयएसए यांच्यात वाद होऊन विद्यापीठात राडा झाला होता. निरपराध विद्यार्थ्यांना मारहाण, तसेच विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी देण्याचे प्रकार घडले होते. यामुळे संतप्त गुरमेहरने सोशल मीडियावर ‘मी अभाविपला घाबरत नाही’ ही मोहीम सुरू केली.
तिच्या या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, भाजपा नेत्यांनी तिला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बलात्काराच्या धमक्या दिल्याची तक्रार गुरमेहरने सोमवारी दिल्ली महिला आयोगाकडे केली. त्यानंतर, आयोगाने गुरमेहरला पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना दिल्या. गुरमेहरने तिच्या तक्रारीत पुरावे म्हणून बलात्काराच्या धमकीचे स्क्रीनशॉट दिले आहेत.
सेहवागने केली टिंगल
गुरमेहरने गेल्या आठवड्यात फेसबुकवर, ‘मी दिल्ली विद्यापीठाची एक विद्यार्थिनी आहे. मला अभाविपची भीती वाटत नाही. भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे,’ हा मेसेज टाकताच, वर्गमित्र आणि इतर विद्यार्थ्यांनी तिची पोस्ट शेअर केली, पण माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा आदींनी तिची ‘राजकीय प्यादे’ अशी संभावना केली. सेहवागने तर तिची टिंगलच केली.
त्यावर ती म्हणाली, ‘त्यांनी माझी देशभक्तीची कल्पना समजलेली नाही. शिवाय ही राजकीय चळवळ नाही. हा मुद्दा विद्यार्थ्यांशी आणि आमचा परिसर हिंसक धमक्यांपासून मुक्त करण्याशी संबंधित आहे. कोणीही कोणाला बलात्काराची धमकी देऊ शकत नाही.’
दाऊद बरा : भाजपा नेते
भाजपाचे खासदार प्रताप सिन्हा यांनी, ‘गुरमेहरपेक्षा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बरा,’ या भाषेत तिच्यावर टीका केली.
>काँग्रेसचा भाजपावर हल्ला
भाजपा नेत्यांनी कारगिल शहिदाच्या मुलीविरुद्ध वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याबद्दल काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका केली. रिजिजू आणि सिन्हा यांची विधाने फॅसिस्ट मानसिकतेचे परिपूर्ण उदाहरण आहे. एखाद्या व्यक्तीचे विचार कदाचित तुम्हाला पटणार नाहीत. म्हणून मग धमक्या देणे योग्य नाही. हे प्रकार लोकशाहीत बसणारे नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली.

Web Title: Rape threat to a girl who speaks against ABVP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.