विज्ञान दिनामागचं गुपित!
By admin | Published: February 28, 2017 06:39 AM2017-02-28T06:39:08+5:302017-02-28T06:39:08+5:30
भारताला विज्ञानाचं पहिलं नोबेल मिळवून देण्याचा मान डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा.
- पवन देशपांडे
भारताला विज्ञानाचं पहिलं नोबेल मिळवून देण्याचा मान डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा. एखाद्या पारदर्शक पदार्थामधून प्रकाश जाताना त्याचे काय काय होते, याचा शोध डॉ. रामन यांनी लावला तो २८ फेब्रुवारीला. हा शोध म्हणजे रामन इफेक्ट. त्याचा सन्मान नोबेलने झाला अन् तेव्हापासून हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन बनला.
डॉ. रामन यांनी शोध लावला ते वर्ष लीप वर्ष होतं. म्हणजे त्यांचा शोध जर एक दिवस उशिरा लागला असता (२९ फेब्रुवारीला) तर हा दिवस दर चार वर्षांनी साजरा करावा लागला असता. हा विज्ञान दिन साजरा व्हावा यासाठी एका द्रष्ट्या शास्त्रज्ञानेच पुढाकार घेतला. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर १९८६ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी अनेक योजना पुढे आणल्या. त्या राबवल्याही. देशभरात विज्ञानाचे जाळे पसरावे आणि त्याची गोडी सर्वांना लागावी, असा विचार करून डॉ. गोवारीकर यांनी विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी रामन इफेक्ट उदयास आलेल्या त्या २८ फेब्रुवारी या दिवसाची निवड केली. पहिला विज्ञान दिन १९८७ साली साजरा केला गेला. सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विज्ञान दिनाच्या व्याख्यानाला डॉ. जयंत नारळीकर यांना आमंत्रित केले गेले होते. आता यावर्षी लोकमतच्या वतीने देण्यात येणाऱ्या खास लेखांमध्येही त्यांचा लेख आहे, हे विशेष.
(शैक्षणिक धोरणातच बदल व्हावा)
(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)
नोबेलच्या रकमेतून हिऱ्यांची खरेदी
डॉ. रामन यांना नोबेल पुरस्कारावेळी जी रक्कम मिळाली त्याचा वापर त्यांनी हिऱ्यांची खरेदी करण्यासाठी केला. अर्थात हिऱ्यांचा त्यांना शौक नव्हता, तर त्यांना त्यावर संशोधन करायचे होते. स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी पैसे खर्च करण्याऐवजी त्यांनी वेगवेगळ्या आकाराचे आणि दर्जाचे हिरे खरेदी केले. हिऱ्यांच्या प्रकाशकीय गुणधर्माचा आणि आंतररचनांचा अभ्यास त्यांना करायचा होता. भविष्यात त्यांनी तो केलाही.