प्रजापती यांना दिलासा नाहीच
By admin | Published: March 7, 2017 03:56 AM2017-03-07T03:56:14+5:302017-03-07T03:56:14+5:30
उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही.
नवी दिल्ली : बलात्काराचा आरोप असलेले आणि त्यामुळे अटक टाळत असलेले उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. प्रजापती यांच्यावर बलात्काराचा आरोप असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अटक टाळण्यासाठीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयानेच प्रजापती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर प्रजापतींनी हा राजकीय कट असल्याचा आरोप करीत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती; मात्र न्यायालयाने ती अमान्य केली.
एका महिलेवर बलात्कार, तिच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आपण उत्तर प्रदेश पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र या चौकशीचा पाठपुरावा केला जात नसल्याचे आढळून आले आहे, असे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले. एफआयआर दाखल करण्याच्या आदेशाला राजकीय रंग देण्यात आल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
समाजवादी पार्टीचे नेते गायत्री प्रजापती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून याबाबतचा कृती अहवाल बंद पाकिटात आठ आठवड्यांत न्यायालयाला सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांना दिले होते.
आपल्याविरुद्धचे आरोप खोटे असून, राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयासमोर योग्य बाजू मांडली नसल्याचा दावा प्रजापती यांनी केला. प्रजापती यांच्याविरुद्धची तक्रार राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली होती. तरीही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>प्रजापतीच्या सहकाऱ्याला अटक
लखनऊ : उत्तर प्रदेशचे फरार कॅबिनेट मंत्री व बलात्कार प्रकरणातील आरोपी गायत्री प्रसाद प्रजापती यांचे सहकारी चंद्रपाल सिंग यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रजापतीसह अन्य आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे. प्र्रजापती यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध लुक आउट नोटीसही जारी करण्यात आली आहे. प्रजापती व अन्य सहा जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेला आहे.
>तक्रारदार भाजपाशी संबंधित?
विरोधकांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रजापती आणि त्यांच्या पक्षावर हल्ले करण्यासाठी या मुद्द्याचा वापर केला.
तक्रारदार भाजपाशी संबंधित असून, राजकीय हेतूने आपल्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे, असा आरोप करून आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना प्रजापती यांनी व्यक्त केली.