साडीचोर दिसला, मग विजय मल्ल्या दिसत नाही का ? सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं
By Admin | Published: March 7, 2017 09:07 AM2017-03-07T09:07:31+5:302017-03-07T09:26:17+5:30
साड्या चोरल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उलट सवाल करत हजारो कोटी बुडवणा-याचं काय अशी विचारणा केली
>ऑनलाइन लोकमत
तेलंगणा, दि. 7 - दुकानातून पाच साड्या चोरल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उलट सवाल करत हजारो कोटी बुडवणा-याचं काय अशी विचारणा केली. सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून परदेशी पसार झालेल्या विजय मल्ल्या यांच्याकडे होता.
सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी विजय मल्ल्या यांच्या नावाचा उल्लेख न करता, 'हजारो कोटी बुडवून पसार झालेली व्यक्ती आनंदात जगत आहे. पण इथे एक व्यक्ती ज्याने पाच साड्या चोरल्या तो कारागृहात आहे', अशी खंत व्यक्त करत तेलंगणा सरकारला चांगलंच सुनावलं.
चेलियाह यांच्या पत्नीने केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. चेलियाह यांना साड्या चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून गेल्या एक वर्षांपासून कोणत्याही खटल्याविना ते कारागृहात बंदिस्त आहेत. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने साडी चोरल्याबद्दल प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवलं जाऊ शकतं का ? असा सवाल विचारला.
चेलियाह यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याच्या दावा त्यांच्या वकिलांनी केला. हैदराबाद आणि इतर ठिकाणी साडी चोरांची टोळी सक्रिय होती, अनेक व्यापा-यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच अटक करणं गरजेचं असल्याची बाजू तेलंगणा सरकारने मांडली. न्यायालयाने बुधवारपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.