उत्तर प्रदेशात दलित-ओबीसी मुख्यमंत्री व्हावा, साक्षी महाराजांनी काढलं ओबीसी कार्ड
By admin | Published: March 11, 2017 10:38 AM2017-03-11T10:38:01+5:302017-03-11T10:39:41+5:30
भाजपा खासदार साक्षी महाराजांनी ओबीसी कार्ड टाकलं असून मुख्यमंत्रीपदी दलित किंवा ओबीसी व्यक्ती विराजमान व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 11 - उत्तरप्रदेशात भाजपाने प्रचंड मोठी आघाडी घेत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. उत्तरप्रदेशात भाजपा सत्तेवर येणार आहे हे जवळजवळ निश्चित झालं आहे. त्यामुळे आता सत्तेनंतरची समीकरणं जुळवणं सुरु झाल्याचं दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर भाजपा खासदार साक्षी महाराजांनी ओबीसी कार्ड टाकलं असून मुख्यमंत्रीपदी दलित किंवा ओबीसी व्यक्ती विराजमान व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
उत्तरप्रदेशात भाजपा 290 जागांवर आघाडीवर असून समाजवादी पक्ष आणि काँग्रेस 75 आणि मायावतींची बसपा 20 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे भाजपाला 1991 नंतर पहिल्यांदाच उत्तरप्रदेश निवडणुकीत इतकी मोठी आघाडी मिळाली आहे. 1991 मध्ये भाजपा 221 जागांसह बहुमत मिळवत सत्तेत आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाने राम मंदिराचा मुद्दा उचलला होता. मात्र या निवडणुकीत राम मंदिराचा उल्लेखही झाला नाही.
उत्तरप्रदेश निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ला प्रचारात पुर्णपणे झोकून दिलं होतं. सध्याचे निकाल पाहता मोदींची ही मेहनत कामी आल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केलेला नसून संसदीय बोर्ड याबाबतचा निर्णय घेईल, असं जाहीर केलं आहे. सत्तेत आल्यानंतर आता मुख्यमंत्री नेमका होणार कोण हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. उत्तरप्रदेशात 20 ते 22 टक्के दलित समाज आहे, तर 27 टक्के मागासवर्गीय आहेत. हे लक्षात घेता दलित किंवा ओबीसींना मुख्यमंत्रिपद मिळावं, अशी साक्षी महाराजांची इच्छा आहे.
उत्तरप्रदेशात भाजपा 1985 पासून निवडणूक लढवत आहे. पहिल्या निवडणुकीत भाजपाने 16 जागा जिंकल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा 328 जागांवर आघाडीवर होती. नरेंद्र मोदींची ही लाट अद्यापही कायम असून भाजपा 200 हून जास्त जागांवर आघाडीवर आहे.
काय होता 1991 मधील निवडणूक निकाल -
भाजपा - 221
काँग्रेस - 46
बसपा - 12
जनता दल - 92
जनता पार्टी - 34
बहुतांश एक्झिट पोल्सनी आणि सट्टा बाजाराने उत्तरप्रदेशात भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. उत्तरप्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशचा निकाल देशातील सद्य राजकीय समीकरणे बदलू शकतो तसेच दोन वर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही हा निकाल महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपाने उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकत पणाला लावली आहे. एक्झिट पोल्सचा अंदाज खरा ठरला तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट होईल आणि निकाल विरोधात गेल्यास भाजपाला प्रादेशिक पक्षांबरोबर सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल.
उत्तरप्रदेशचे राजकारण जवळून पाहणा-या राजकीय विश्लेषकांना या राज्यांत कोणालाच बहुमत मिळणार नाही, असेच वाटत होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आमच्या आघाडीलाच बहुमत मिळेल, असा दावा केला होता. भाजपाला रोखण्यासाठी प्रसंगी आम्ही मायावती यांची मदत घ्यायचा विचार करू, असे अखिलेश यांनी म्हटले असले तरी बसपाने आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
काय होता एक्झिट पोलचा अंदाज-
- टाइम्स नाऊ आणि व्हिएमआरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये 403 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 190 ते 210 जागा मिळण्याची शक्यता, समाजवादी पक्ष - कॉंग्रेसला 110 ते 130 जागा, बहुजन समाज पक्षाला 54 ते 57 जागा .
- नेटवर्क- 18 च्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपा 185 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष -काँग्रेसला 120 जागा आणि बसपला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- एबीपी माझा-सीएसडीएस'च्या एक्झिट पोलमधील आकडेवारी वेगळी आहे. यामध्ये भाजपला 164-176 जागा, सपा-काँग्रेसला 156-169 जागा , बसपला 60-72 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- इंडिया टीव्ही-सीव्होटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठी पार्टी बनेल. यानुसार भाजपाला 185 जागा , समाजवादी पक्षाला 120 जागा आणि बसपाला 90 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे