उत्तर प्रदेशात भगवी लाट, भाजपाची जोरदार मुसंडी

By admin | Published: March 11, 2017 05:20 PM2017-03-11T17:20:50+5:302017-03-11T22:10:54+5:30

उत्तर प्रदेशमध्ये 312 जागांवर भगवा फडकला.

The heat wave in Uttar Pradesh, the BJP's strong pitch | उत्तर प्रदेशात भगवी लाट, भाजपाची जोरदार मुसंडी

उत्तर प्रदेशात भगवी लाट, भाजपाची जोरदार मुसंडी

Next

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. 11 - उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपानं 312 जागांवर भगवा फडकला आहे. हा विजय केवळ अभूतपूर्वच नाही तर भाजपाच्या भवितव्यासाठीही उत्साहवर्धक आहे. उत्तर प्रदेशात भाजपा, समाजवादी आणि काँग्रेसची आघाडी व बसप असा त्रिकोणी संघर्ष होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही यंदाची निवडणूक अधिक महत्वाची होती. त्यात भाजपने बाजी मारली आहे. ‘युपी को ये साथ पसंद है’ घोषवाक्यासह ज्यांना ‘युपी के लडके’ संबोधले गेले, त्या अखिलेश व राहुल यांच्या तरुण जोडीला मतदारांनी साफ नाकारले. 2007 साली राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करणाऱ्या मायावतींच्या बसपचा खेळ तर अवघ्या 19 जागांवरच आटोपला आहे.

या दोघांना टाळून उत्तर प्रदेशच्या जनतेने दत्तक पुत्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली आहे.
उत्तर प्रदेशची राजकीय विभागणी मुख्यत्वे पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य उत्तर प्रदेश, बुंदेलखंड व पूर्वांचल अशा चार भागांमध्ये होते. जाहीर निकालांमधे चारही क्षेत्रात भाजपने यंदा जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशच्या मुस्लिमबहुल मतदारसंघातही भाजपचा भगवा डौलाने फडकला आहे. निवडणुकीच्या काळात भाजपचे नेते आणि उमेदवार नोटबंदीच्या विषयावर बोलणे टाळायचे कारण त्याच्या विपरीत परिणामांना ते घाबरत होते. प्रत्यक्षात निकालाचे आकडे पहाता नोटबंदीचा परिणाम मतदानावर झालेला दिसत नाही. पश्चिम युपीत जाट मतदार भाजपपासून दुरावले होते.

अजित सिंगांच्या रालोदकडे जाट वळतील असे चित्र होते मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. भाजपने वर्षभरापासून परंपरागत सवर्ण मतदारांखेरीज, गैरयादव ओबीसी व गैर जाटव दलितांना भाजपाकडे ओढण्याचे सर्वंकष प्रयत्न चालवले होते. या प्रयत्नांना चांगलेच यश प्राप्त झाले आहे, असे निकालातून स्पष्ट झाले. पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथसिंग, उमा भारती, केशवप्रसाद मौर्य, योगी आदित्यनाथ अशा मोजक्या स्टार प्रचारकांवर भाजपच्या प्रचाराची भिस्त होती. मतदानाच्या पहिल्या तीन टप्प्यांपर्यंत या सर्वांनी भाषणात विकास, सुशासन इत्यादी मुद्यांवर भर दिला मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही असे लक्षात येताच, धार्मिक धुव्रीकरणाच्या आपल्या जुन्याच पवित्र्याला या सर्वांनी प्रचाराचा केंद्रबिंदू बनवले. उत्तरप्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली नव्हती. पूर्वांचलचे प्रमुख केंद्र वाराणसीत पंतप्रधानांसह साऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आपला तळ ठोकला होता. या भागात नोटबंदीने दुखावलेल्या बनिया, व्यापारी, ब्राह्मण व सवर्ण जातींच्या मतदारांना पुन्हा वश करण्यात भाजपने यश मिळवलेले दिसते. सुमारे 60 नेत्यांच्या कुटुंबीयांना भाजपने उमेदवारी दिली. ऐनवेळी अन्य पक्षातून दाखल झालेल्या अनेक उमेदवारांना अमित शाह यांनी तात्काळ तिकिटे वाटली भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते त्यामुळे नाराज आहेत, अशी चर्चा ऐकायला मिळाली. मोदींच्या लाटेत मात्र हे बहुतांश उमेदवार विजयी ठरले आहेत.

भाजपची खरी लढत यंदा समाजवादी आणि काँग्रेसच्या आघाडीबरोबर होती. अखिलेश यादवांनी अखेरपर्यंत मोदींना कडवी झुंज दिली. प्रत्येक मुद्यावर ते संयत भाषेत बोलायचे. तथापि वर्षभरापासून यादव कुटुंबात सुरू असलेला अंतर्कलह समाजवादी पक्षाच्या पराभवाला निश्चितपणे कारणीभूत ठरला आहे. याखेरीज अखिलेश यादवांच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, मुझफ्फरनगरसह राज्याच्या विविध भागातल्या दंगली, नोकऱ्यांपासून सर्व क्षेत्रात यादव समाजाला मिळणारे प्राधान्य, आघाडीच्या कार्यक र्त्यांमधे समन्वयाचा अभाव, अशा विविध कारणांमुळे मतदारांची नाराजी मतदानातून स्पष्ट झाली आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेसला भरघोस जागा मिळतील अशा चमत्काराची अपेक्षा काँग्रेसजनांसह कोणालाही नव्हती कारण राज्यात काँग्रेसचे नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी अशी अवस्था अनेक वर्षांपासून आहे. देवरीया ते दिल्ली अंतराची राहुल गांधींची किसान यात्रा, जागोजागी झालेल्या खाटसभा आणि निवडणुकीतल्या प्रचार सभांचाही मतदारांवर फारसा प्रभाव पडला नाही. सोनिया गांधींसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रचारासाठी कुठेही हिंडले नाहीत. प्रियंका गांधी फक्त एका सभेत बोलल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बहुतांश उमेदवार समाजवादी पक्षाच्या भरवशावरच निवडणूक लढत होते.

भाजपने अपना दल सारख्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन राज्यातल्या सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवली. अमित शाह यांनी 300+ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरवले. काही मतदारसंघात सप काँग्रेसच्या विरोधात तर काही ठिकाणी बसपच्या विरोधात आणि काही ठिकाणी अन्य पक्षांच्या विरोधात भाजपाने लढत दिली. अंतिम लढतीत भाजप मात्र सर्वत्र कॉमन होता. त्याचा सकारात्मक परिणाम उत्तर प्रदेशच्या मतदारांवर झाला. जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांच्या पारड्यात भरघोस मतदान झाल्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशात अभूतपूर्व यश मिळाले.

Web Title: The heat wave in Uttar Pradesh, the BJP's strong pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.