गोव्यात भाजपाला धक्का; काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष
By admin | Published: March 12, 2017 12:47 AM2017-03-12T00:47:54+5:302017-03-12T00:47:54+5:30
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसले, तरी ४0 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस १७ जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. गेली पाच वर्षे राज्य
- सद्गुरू पाटील, पणजी
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसले, तरी ४0 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस १७ जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. गेली पाच वर्षे राज्य केलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसह एकूण सहा मंत्री पराभूत झाले. या निवडणुकीत पाच माजी मुख्यमंत्री विजयी झाले, तर तिघा अपक्षांनी बाजी मारली. रोहन खंवटे यांनी सलग दुसऱ्यांदा पर्वरीतून अपक्ष जिंकून इतिहास घडवला.
आम्हाला पर्याय नाही. आम्ही महिलांसाठी प्रचंड योजना राबविल्या आहेत, संघटनात्मक बांधणी आमच्याकडेच आहे, अशा वल्गना करून २३ ते २६ जागा जिंकण्याचा दावा भाजपा नेते गेले वर्षभर करत होते. प्रत्येक मतदारसंघात भाजपाने प्रचंड पैसा निवडणुकीवेळी खर्च केला. हाती पोलीस यंत्रणादेखील होती. तरीसुद्धा मतदारांनी भाजपाला २१वरून १३ जागांपर्यंत खाली आणले. केंद्रात व गोव्यातही सत्ता असूनदेखील भाजपाचा पराभव झाला. याउलट पाच वर्षांपूर्वीच २०१२ सालच्या निवडणुकीत ज्या काँग्रेसला केवळ ९ जागा मिळाल्या होत्या, तो पक्ष या वेळी १७ मतदारसंघांमध्ये बाजी मारू शकला.
२०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. या वेळी चर्चिल आलेमाव यांच्या रूपाने राष्ट्रवादीला एक जागा जिंकता आली. बाणावली मतदारसंघातून चर्चिल यांनी विधानसभेत पुनरागमन केले आहे.
२०१२ साली फोंड्यात पराभूत झालेले माजी मुख्यमंत्री रवी नाईक, २००७ साली नावेलीत पराभूत झालेले लुईझिन फालेरो यांचेही विधानसभेत आता पुनरागमन झाले आहे.
रवी, फालेरो, प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत व चर्चिल आलेमाव हे पाचही माजी मुख्यमंत्री जिंकले.
गोव्यावर राज्य करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमी पक्षाला खातेही खोलता आले नाही. सर्व मतदारसंघांमध्ये ‘आप’चा दारुण पराभव झाला. नव्यानेच स्थापन झालेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने चार जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तीन जागा मिळवून या पक्षाने मोठे यश मिळविले. गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांनी भाजपाच्या दोघा ज्येष्ठ मंत्र्यांचा दणदणीत पराभव केला. भाजपाशी युती तोडून बंडखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी व शिवसेनेशी युती केलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या वाट्याला अपेक्षाभंग आला. आपल्याला किमान ८ जागा मिळतील, असा दावा करणाऱ्या मगोपला केवळ तीनच मतदारसंघ जिंकता आले. त्यातही मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा पराभव झाला.
भाजपाचे चार विद्यमान पराभूत
भाजपाचे मुख्यमंत्री पार्सेकर यांच्यासह मंत्री महादेव नाईक, दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, आवेर्तान फुर्तादो, राजेंद्र आर्लेकर हे सहा जण पराभूत झाले. याशिवाय भाजपाचे चार विद्यमान आमदार पराभूत झाले. काँग्रेसच्या जेनिफर मोन्सेरात व भाजपाच्या एलिना साल्ढाणा या दोन महिला आमदार पुन्हा निवडून आल्या.
- वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच व शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही.