दलाई लामांना अरुणाचलमध्ये प्रवेश देणं भारताची मोठी चूक - चीन
By admin | Published: April 1, 2017 11:51 AM2017-04-01T11:51:15+5:302017-04-01T12:03:31+5:30
तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश प्रवेश रोखू न शकल्याने चिडलेल्या चीनने भारताला ही तुमची मोठी चूक असल्याचं सांगितलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 1 - तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश प्रवेश रोखू न शकल्याने चिडलेल्या चीनने भारताला ही तुमची मोठी चूक असल्याचं सांगितलं आहे. सीमारेषेवरील राज्यात दलाई लामांना प्रवेश देण चूक असल्याचं सांगत चीन भारताविरोधातील आपला राग व्यक्त करत आहे.
"दलाई लामांना अरुणाचल प्रदेशात प्रवेश दिल्याने द्विपक्षीय संबंधांवर याचा फरक पडेल", अशी धमकीचं चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी दिली आहे. अरुणाचल प्रदेशात दलाई लामांनी कोणतीही हालचाल करणं चीनच्या पचनी पडत नसून त्यांनी वारंवार यासंबंधी भारताकडे आपला निषेध व्यक्त केला असल्याचंही ते बोलले आहेत.
भारताने दावा केलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरात चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरसाठी चीनकडून पायाभूत सुविधांचं बांधकाम सुरु असून चीनने या मुद्यावरुनही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरमुळे भारताच्या काश्मीर प्रश्नावर कोणताही प्रभाव पडणार नसून भारताला चिंता करण्याची गरज नाही असं चीनचं म्हणणं आहे.
Dalai Lama visited Tawang many times in the past so this is not a new issue: Sonam, spokesperson of Tibetan government in-exile pic.twitter.com/7P5J7Ma1Vm
— ANI (@ANI_news) April 1, 2017
गेल्यावर्षीच धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवत परवनागी दिली होती. भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन मात्र चिडण्याची शक्यता होती, त्याप्रमाणे चीनने आपला राग व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्याही अरुणाचल प्रदेश दौ-याला चीनने याअगोदर विरोध केला होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या आक्षेपाला फेटाळलं होता. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक असल्याचं भारताने स्पष्ट सांगितलं होतं.
चीनने 2009 मध्येदेखील दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला विरोध केला होता. चीन विरुद्धचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा याच दिवशी १७ मार्च १९५९ रोजी भारतात येण्यासाठी निघाले होते. हिमालयीन पर्वतरागांमधून १५ दिवस पायी प्रवास करुन चीनी सैनिकांना चुकवत दलाई लामा भारतात दाखल झाले होते.
अरुणाचल प्रदेश भारत आणि चीनमधील वादग्रस्त भाग असल्याने अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा आपण विरोध करतो असं चीनने म्हटलं होतं. तवांग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी वर्मा यांनी हा दौरा केला होता.
चीनने अगोदरपासून अरुणाचल प्रदेशावर दावा केला असून हा भारताचा भाग असल्याचं मानत नाही. राज्यातील 83,500 चौ.कि.मी परिसरावर चीनने दावा केलेला आहे.