रवींद्र गायकवाड यांना खेद; विमानबंदी उठण्याची शक्यता

By admin | Published: April 7, 2017 06:30 AM2017-04-07T06:30:14+5:302017-04-07T06:30:30+5:30

शिवसेनेचे रवींद्र गायकवाड प्रकरणी शिवसेनेने लोकसभेत गुरुवारी रुद्रावतार धारण केला

Ravindra Gaikwad sorry; The possibility of raising the aircraft | रवींद्र गायकवाड यांना खेद; विमानबंदी उठण्याची शक्यता

रवींद्र गायकवाड यांना खेद; विमानबंदी उठण्याची शक्यता

Next

सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- शिवसेनेचे रवींद्र गायकवाड प्रकरणी शिवसेनेने लोकसभेत गुरुवारी रुद्रावतार धारण केला आणि विमानबंदी उठवण्याचा निर्णय १0 एप्रिलपर्यंत न झाल्यास ११ एप्रिलच्या रालोआच्या बैठकीला आम्ही हजर राहणार नाही, असे संजय राऊ त यांनी जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी गायकवाड एअर इंडियाची माफी मागेपर्यंत प्रवासबंदी उठणार नाही, अशी आग्रही भूमिका नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी घेतल्यामुळे कोंडी कायम आहे.
गायकवाडांनी संसदेत व विमानात घडलेल्या प्रकरणाबाबत खेद व्यक्त करणारे पत्र राजू यांना संध्याकाळी पाठविल्याची चर्चा असून, त्यामुळे तोडगा निघेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्यास किती वेळ लागेल, हे सांगणे अवघड आहे.
गायकवाडांनी निवेदन केल्यानंतर विमान वाहतूक मंत्री म्हणाले की, दररोज हजारो प्रवासी विमानाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता येणे शक्य नाही. शिवसेनेला सदर प्रकरण शांततेने मिटवायचे असेल, तर ते मिटवायची तयारी आहे. प्रकरण वाढवायचे असेल तर तो त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे. या विधानामुळे सेना सदस्य संतप्त झाले. त्याचवेळी एखाद्यावर कोणत्या कायद्याने एअरलाइन्स एकतर्फी बंदी घालू शकतात, असा सवाल केला. त्यांच्या या प्रश्नाला अन्य विरोधी खासदारांनीही साथ दिली. परिणामी संतप्त वातावरणात आणखी भर पडली आणि अनंत गीते अशोक गजपती राजू यांच्यावर भडकले. त्यांना शांत करून, त्यांच्या आसनावर बसवण्यासाठी स्मृती इराणी व गृहमंत्री राजनाथसिंगांना हस्तक्षेप करावा लागला. दुसरीकडे राज्यमंत्री अहलुवालियाराजू यांना सभागृहाबाहेर घेऊ न गेले. नंतर पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊत म्हणाले की, गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी त्वरित उठवली गेली नाही तर १0 तारखेला होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत शिवसेना सहभागी होणार नाही. हे आपण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सांगत आहोत.
>तीनदा कामकाज तहकूब
या सर्व गदारोळात आधी एकदा आणि नंतर दोनदा लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज तहकूब केले. दुपारी ३ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा प्रकरणावर पडदा टाकताना राजनाथसिंह म्हणाले, अशा दुर्दैवी घटना सभागृहात घडायला नकोत. गायकवाडांनी आपले म्हणणे मांडले आहे. गीते व राजू यांची चर्चा झाली आहे. गायकवाड यांच्या विमानप्रवासावर एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांनी घातलेल्या बंदी प्रकरणातून सामंजस्याने लवकरच मार्ग काढला जाईल.
>एअर इंडिया कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढविणार
शिवसेना खासदारांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत एअर इंडिया मुंबई आणि पुणे विमानतळांवरील आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढविणार आहे. या दोन विमानतळांवरील एअर इंडियाचे काम बंद पाडण्याचा इशारा शिवसेना खासदारांनी दिला आहे.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही जोखीम घेऊ शकत नाही, असे एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. मुंबई आणि पुणे विमानतळावरील एअर इंडियाचे काही कर्मचारी भारतीय कामगार सेनेशी संलग्न असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जाणार आहेत.
>त्यांची औकात काय?
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले : कोण सीएमडी? त्याची औकात ती काय? विजय मल्ल्यासारख्या आर्थिक गुन्हेगारांना देशातून पळून जाण्यासाठी ज्या विमान कंपन्या मदत करतात, गुन्हेगार, दहशतवादी बिनदिक्कतपणे ज्यांच्या विमानातून फिरतात, त्या एअरलाइन्स गायकवाडांवर बंदी कशी घालू शकतात? गायकवाड काय दहशतवादी आहेत? आम्हाला सभ्यपणा शिकवणाऱ्यांनी अगोदर स्वत: सभ्यपणे वागायला शिकावे. कोणाच्या दबावाखाली हे सारे घडते आहे? कोण शिवसेनेला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे, असा सवाल करून राऊत पुढे म्हणाले, सर्वांना आम्ही एकच गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवसेना हा आंदोलनातून उभा राहिलेला पक्ष आहे. कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही.

Web Title: Ravindra Gaikwad sorry; The possibility of raising the aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.