कुलभूषण जाधव यांना वाचवूच!

By Admin | Published: April 12, 2017 04:35 AM2017-04-12T04:35:58+5:302017-04-12T06:37:35+5:30

वाट्टेल ते करून जाधव यांना सोडवण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली.

Save Kulbhushan Jadhav! | कुलभूषण जाधव यांना वाचवूच!

कुलभूषण जाधव यांना वाचवूच!

googlenewsNext

मुंबई : पाकिस्तानने हेरगिरीचा ठपका ठेवलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर नव्हे तर व्यावसायिक व सर्वसामान्य भारतीय आहेत. पाकिस्तानने त्यांना सन्मानाने सोडायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करत जाधव यांच्या सुटकेसाठी सरकार म्हणून जे काही करता येईल ते सर्व करू. वाट्टेल ते करून जाधव यांना सोडवण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली.
यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या न्यूज अँकर व पत्रकार अंजना कश्यप यांनी राजनाथ सिंह यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले, जाधव गुप्तहेर असते तर त्यांच्याकडे भारताचा पासपोर्ट नसता, ही साधी गोष्ट आहे. पण पाकिस्तानला या वास्तवाशी देणेघेणे नाही. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे पूर्वनियोजित खून आहे. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत निषेध करतो, असेही राजनाथ यांनी ठणकावले.
पाकवर काय उपचार करायचा, ते काळ ठरवेल. कोणाचाही स्वभाव बदलण्यास वेळ लागतो. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवू, असे सांगत पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
काश्मीर सध्या अशांत असले तरी वर्षभरात काश्मीरमध्ये परिवर्तन दिसेल. काश्मीरमधील नैसर्गिक आपत्तीत भारतीय जवानच तेथील जनतेच्या मदतीला धावून जातात. तरीही त्यांच्यावर दगडफेक होते, याचा विचार तेथील जनतेनेच करायला हवा. आताच सरकारची योजना उघड करता येणार नाही. पण एक नक्की सांगतो की वर्षभरात काश्मीरमधील परिस्थितीत बदल झालेला दिसेल. फारु ख अब्दुल्ला यांनी जवानांवर दगडफेक करणाऱ्यांचे केलेले समर्थन चुकीचे असून त्यांनी तसे करायला नको होते, असेही सिंह यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)

दाऊदवर कारवाई सुरू : दाऊद इब्राहिमवर मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटांसह विविध ३१ खटले आहेत. तो सध्या कराचीत आहे, याची खात्रीशीर माहिती भारताकडे आहे. दाऊदविरोधात भारताने कारवाई सुरू केली आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन ठिकाणी त्याबाबतची कारवाई झाली, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात होता विजयाचा विश्वास
उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील विजयावर बोलताना, आमचे स्पष्ट बहुमत येईल याचा मला विश्वास होता. पंतप्रधानांनाही मी तसे सांगितले होते.
जास्तीत जास्त २५० जागा येतील, असा अंदाज होता. पण ३२५ जागा मिळाल्या. ते संख्याबळ आमच्यासाठी अविश्वसनीय होते, अशी कबुलीही त्यांनी दिली.
मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही, याकडे लक्ष वेधले असता, जो विजयी होऊ शकेल त्यालाच तिकीट दिले, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपाने मुस्लिमांना तिकीट दिले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

 

Web Title: Save Kulbhushan Jadhav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.