कुलभूषण जाधव फाशीप्रकरणी रवीना टंडनचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल
By admin | Published: April 13, 2017 12:09 PM2017-04-13T12:09:13+5:302017-04-13T12:15:20+5:30
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या समर्थनार्थ आता अभिनेत्री रवीना टंडनही मैदानात उतरली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या समर्थनार्थ आता अभिनेत्री रवीना टंडनही मैदानात उतरली आहे. जाधव यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवत पाकिस्ताननं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. यावर संताप व्यक्त करत रवीनानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रश्न विचारला आहे. "आपण केवळ जाधव यांना मरताना पाहत बसणार आहोत का?", असा सवाल तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
या ट्विटमध्ये तिनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही टॅग केलं आहे. दरम्यान, यापूर्वीही बिनधास्त रवीनानं सामाजिक तसेच देशासंबंधी महत्त्वाच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. गंभीर स्वरुपातील विषयांवर उघडपणे मुद्दे मांडणं, चर्चा करणं आणि प्रश्न उपस्थित करणं यासाठी रवीनाचा बिनधास्त स्वभाव प्रसिद्ध आहे.
सलमान खानचे वडील सलीन खान यांनीही कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, "एका निरपराध व्यक्तीचा जिव घेणं म्हणजे माणुसकीचा जिव घेण्यासमान आहे. पाकिस्तानसमोर भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची ही एक चांगली संधी आहे. जाधव सुखरुप परतावेत यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत".
पाकिस्तानात दहशतवादाच्या आरोपाखाली फाशी देण्यात आलेले सरबजीत सिंह यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा त्यांची भूमिका निभावलेला अभिनेता रणदीप हुडानंही कुलभूषण जाधव फाशी प्रकरणी ट्विट केले आहे.
"कोणताही खटला नाही, पुरावा नाही, केवळ बंद खोलीत लष्करी न्यायालयाची कारवाई?. पाकिस्तान दुसरा सरबजीत करत आहे", असे ट्विट रणदीपनं केलं असून त्यानंही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही टॅग केलं आहे. सोबत त्यानं मला माझ्या देशातील नेतृत्वावर विश्वास आहे, असेही नमूद केले आहे.
Are we just going to sit and watch jadhav die?? @narendramodi@SushmaSwaraj@rajnathsingh
— Raveena Tandon (@TandonRaveena) April 13, 2017
Ek begunah aadmi ko maarna saari insaniyat ko marne ke barabar hai - Hadith (Hadis) #KulbhushanJadhav
— Salim Khan (@luvsalimkhan) April 12, 2017
Pakistan talks about maintaining a good relationship with India. Here is the opportunity. Let us pray for his safe return. #KulbhushanJadhav
— Salim Khan (@luvsalimkhan) April 12, 2017
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कुलभूषण जाधववर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालवण्यात आले आणि त्यात दोषी ठरल्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमाल जावेद बाजवा यांनी या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब केले, असेही त्यात नमूद करण्यात आले.
कुलभूषण यांनी गुन्हा कबूल केल्याचा दावा
जाधव यांनी दंडाधिकाऱ्यांपुढे आणि न्यायालयातही गुन्हे कबूल केल्याचा दावा करून या पत्रकात म्हटले की, बलुचिस्तान आणि कराचीमधील अशांतता काबूत आणण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणून तेथे आणखी अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी व हेरगिरी करण्यासाठी ‘रॉ’ने आपल्याला पाठवल्याचे जाधव यांनी शपथेवर कबूल केले. याआधी पाकिस्तान लष्कराने जाधव यांच्या या कथित कबुलीजबाबाचा व्हिडीओही जारी केला होता.