लालूंचे मोदींना चॅलेंज, तर बरखास्त करून दाखवा लोकसभा
By admin | Published: May 15, 2017 01:37 PM2017-05-15T13:37:14+5:302017-05-15T13:37:14+5:30
भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असं आव्हान लालूप्रसाद यादव यांनी मोदींना दिलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा बरखास्त करून इतरा राज्यांसोबत निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असं आव्हान लालूप्रसाद यादव यांनी मोदींना दिलं आहे. मोदींनी लोकप्रियतेची चाचपणी करण्यासाठी विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसोबत लोकसभेचीही निवडणूक घ्यावी, असे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत.
राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रितरीत्या घ्याव्यात, नीती आयोगाच्या सूचनेचेही लालूप्रसाद यादव यांनी समर्थन केलं आहे. लालूप्रसाद यादव म्हणाले, सरकारला तीन वर्षे झाली आहेत. आता लवकरच सहा राज्यांचा विधानसभा निवडणुका होणार आहेत. या वर्षभरात गुजरात, नागालँड, कर्नाटका, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरा राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मोदी सरकारमध्ये हिंमत असल्यास त्यांनी लोकसभा बरखास्त करून ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांसोबतच लोकसभेची निवडणूक घ्यावी, त्यावेळी तुम्हाला तुमच्या लोकप्रियतेची जाणीव होईल, अशी टीकाही लालूंनी मोदींवर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य केलं आहे.
लालूप्रसाद यादव म्हणाले, नीती आयोगाने विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा पर्याय सुचवला आहे. नीती आयोगाला संघराज्यीय पद्धत आणि प्रादेशिक पक्षांना संपवायचे असल्यानंच असे पर्याय सुचवले जात आहेत. नीती आयोगाच्या माध्यमातून भाजपाचा घटनेत बदल करण्याचा डाव असल्याचाही आरोप लालूंनी केला आहे. देश मोदींच्या हाती सुरक्षित नाही. मोदींना देशाचे तुकडे करायचे आहेत. यांनी देशांतर्गत अस्थिरता निर्माण केली असून, भाजपाचे सरकार हे घाबरट आहे. ते फक्त सत्तेसाठी लाचार आहेत, असंही लालू म्हणाले आहेत.
मोदींच्या सत्ताकाळातच आमच्या अनेक जवानांचे खुलेआम शिर कापले गेले. याला जबाबदार कोण, असा प्रश्नही लालूप्रसाद यादवांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस (यूपीए) सरकार केंद्रात होते. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला नाही. पण आता तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातोय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही सत्तेवर असताना काश्मीरमधील मतदानाचा टक्काही चांगला होता. आज तो घसरला असून अवघे सात टक्के मतदान नोंदवले गेले आहे. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीने हुतात्म्याचा दर्जा दिला होता. आज त्याच पक्षाच्या सोबतीनं भाजपाने सरकार स्थापन केल्याची टीकाही मोदींनी केली आहे.