एका SMSवर मिळवा पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर
By admin | Published: June 13, 2017 11:25 AM2017-06-13T11:25:00+5:302017-06-13T11:25:00+5:30
ग्राहकांना पेट्रोल आणि डिझलच्या रोजच्या दराविषयी माहिती देण्यासाठी तेल कंपन्यांनी विशेष व्यवस्था केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज ठरणार आहेत, या दरांमध्ये रोज बदल होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना पेट्रोल आणि डिझलच्या रोजच्या दराविषयी माहिती देण्यासाठी तेल कंपन्यांनी विशेष व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेमध्ये ग्राहकांनी मोबाईलवरून एक SMS केल्यास घरबसल्या त्यांना दरांची माहिती समजणार आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलण्याच्या निर्णयाला वितरकांनी विरोध केला होता. पण, तेल कंपन्या या निर्णयावर ठाम आहेत. यासंदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुसार वितरकांना आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दुसऱ्या दिवशीचे दर कळविले जातीला. तर सामान्य ग्राहकांना मोबाईलवरून SMS पाठवून प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती मिळवता येईल. यासंबंधी हिंदूस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी आदेश जारी केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 16 जूनपासून इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलणार आहेत. याआधी पुदुच्चेरी, उदयपूर, आंध्र प्रदेशमधील विझाग, जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरांमध्ये १ मेपासून प्रायोगिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलले जात होते. या शहरांमधील प्रतिसादाच्या आधारे देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
असे जाणून घ्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावरील दर
- तुम्ही www.iocl.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.
- Fuel@IOC हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही जवळपासच्या पेट्रोल पंपावरील दर समजतील.
- मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवावा. पण, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणं आवश्यक आहे.
असे जाणून घ्या भारत पेट्रोलियम’च्या पेट्रोल पंपावरील दर
- www.bharatpetroleum.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या दराची माहिती मिळेल.
- मोबाइलवर SmartDrive हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर किंमतीची माहिती मिळेल.
- मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२३११२२२२ या क्रमांकावर SMS पाठवावा. पण, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणं आवश्यक आहे.