कोविंद यांच्याविरोधात यूपीएच्या मीरा कुमार!
By admin | Published: June 23, 2017 03:13 AM2017-06-23T03:13:42+5:302017-06-23T03:25:09+5:30
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात विरोधी पक्षांतर्फे काँग्रेस नेत्या मीरा कुमार निवडणूक लढवणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात विरोधी पक्षांतर्फे काँग्रेस नेत्या मीरा कुमार निवडणूक लढवणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. देशातील १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोविंद यांच्याप्रमाणेच मीरा कुमार याही दलित आहेत. त्यांच्या नावाला मायावती यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपाने दलित उमेदवार दिल्याने विरोधकही दलित चेहराच पुढे आणतील, हे निश्चित होते. अन्यथा दलित उमेदवाराला विरोध करीत असल्याची टीका त्यांच्यावर झाली असती. मीरा कुमार यांच्या निवडीचे हेही एक कारण आहे. माजी लोकसभाध्यक्ष असलेल्या मीरा कुमार या पूर्वी भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी होत्या. त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलै रोजी निवडणूक होणार, हेही स्पष्ट झाले.
संसदेच्या ग्रंथालयात झालेल्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, शरद पवार, राजदचे लालूप्रसाद यादव हे हजर होते. यांच्याखेरीज डाव्या पक्षांतर्फे सीताराम येचुरी, डी. राजा, द्रमुकच्या खा. कणीमोळी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला हेही उपस्थित होते. तृणमूलच्या ममता बॅनर्जी, बसपाच्या मायावती व सपाचे अखिलेश यादव बैठकीला नव्हते. मात्र या तिन्ही पक्षांचे अनुक्रमे डेरेक ओ ब्रायन, सतीश मिश्रा व राम गोपाल यादव हजर होते.
जनता दल (सेक्युलर), क्रांतिकारी समाजवादी पक्ष, केरळ काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लीम लीग व अखिल आसाम युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट यांचेही प्रतिनिधीही बैठकीत होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त)ने बुधवारीच कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला.
त्यामुळे ते वा त्यांचे प्रतिनिधी बैठकीला हजर नव्हते. शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल काही पक्ष साशंक होते. पण काँग्रेस नेते सतत त्यांच्या संपर्कात होते.
राजकारणात उमटवली छाप
माजी उपपंतप्रधान स्व. जगजीवन राम यांच्या कन्या.
बिहारच्या आरा जिल्ह्यात १९४५ साली जन्म. डेहराडून,
जयपूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण.
दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी. डॉक्टरेटही मिळवली.
त्या भारतीय
परराष्ट्र
सेवेत होत्या. सलग पाच
वेळा लोकसभेवर
पहिल्या महिला लोकसभाध्यक्ष होत्या. लोकसभाध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली होती.
२00४ ते २00९ या काळात सामाजिक न्यायमंत्री. काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणूनही काम केले.
मीरा कुमार यांचे पती मंजुळ कुमार पेशाने वकील. वडिलांच्या नावावर नव्हे, तर आपल्या कामाच्या आधारे त्यांनी राजकारणात स्वत:चा ठसा उमटविला.
यांचीही नावे होती चर्चेत
या बैठकीत मीरा कुमार यांच्याबरोबरच सुशीलकुमार शिंदे आणि डॉ. भालचंद्र
मुणगेकर
यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सुचवली, तर डाव्या पक्षांतर्फे सीताराम येचुरी यांनी महात्मा गांधींचे नातू व
माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश
आंबेडकर यांची नावे सुचवली. मात्र चर्चेअंती मीरा कुमार यांच्या नावावर
एकमत झाले.
कोविंद आज अर्ज भरणार
रामनाथ कोविंद उद्या, शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरून सादर करणार आहेत. त्यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून रालोआतील
सर्व घटक पक्षांच्या प्रमुख खासदारांच्या सह्या असतील. अर्ज भरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह प्रमुख केंद्रीय मंत्री तसेच भाजपाशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
नितीशकुमार यांना समजावू : नितीशकुमार यांच्या पक्षाने भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी त्यांच्याशी आमच्या पक्षाशी आघाडी कायम आहे. जनता दल (संयुक्त) व राजद व काँग्रेस
यांच्या महाआघाडी सरकारला धोका नाही, असे लालूप्रसाद यादव म्हणाले.
नितीशकुमारांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, यासाठी त्यांची समजूत काढू, असेही यादव यांनी सांगितले.
कोविंद यांचा मुक्काम महेश शर्मांच्या बंगल्यात
कोविंद यांचा मुक्काम सध्या केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांच्या १०, अकबर रोडवरील बंगल्यात आहे. याआधी शर्मा यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा १०, राजाजी मार्ग हा बंगला दिला होता. परंतु प्रणव मुखर्जी निवृत्तीनंतर तेथे राहणार असल्याने शर्मा यांना १०, अकबर रोड बंगला दिला गेला. आता तोही काही काळ कोविंद यांच्याकडे असेल.
वाजपेयींचा आशीर्वाद
रामनाथ कोविंद सध्या दिल्लीतील सर्व वरिष्ठ भाजप नेत्यांच्या भेटी घेत आहेत. लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची भेट झाल्यानंतर कोविंद गुरुवारी अटलबिहारी वाजपेयी यांचा आशीर्वाद घ्यायला त्यांच्या निवासस्थानी गेले. वाजपेयी रुग्णशय्येवर आहेत.