कोविंद यांची राष्ट्रपतिपदी निवड उरली फक्त औपचारिकता
By admin | Published: June 23, 2017 08:46 AM2017-06-23T08:46:10+5:302017-06-23T09:12:34+5:30
एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23- राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात विरोधी पक्षांतर्फे काँग्रेस नेत्या मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्याची उमेदवारी देण्यात आली. पण अजूनही मीरा कुमार या निवडणुकीत विजयापासून दूर आहेत. पण या उलट एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे. कोविंद यांच्या खात्यात निवडणुकीच्या आधीच एनडीए आणि इतर पक्षांकडून मिळणारी 63.1 टक्के मत जमा आहेत. रामनाथ कोविंद यांना एनडीएच्या 48.9 टक्के मतांचा पाठिंबा आहे. तर जदयूच्या 1.91 टक्के, अण्णाद्रमुखच्या 5.39 टक्के, बिजू जनता दलाच्या 2.99 टक्के , तेलंगणा राष्ट्रसमितीच्या 2 टक्के , वायएसआरसीपीच्या 1.53 टक्के आणि आयएनएलडी या पक्षाच्या 0.38 टक्के मतांचा पाठिंबा रामनाथ कोविंद यांना मिळाला आहे. एकुण मिळून 63.1 टक्के मतांनी रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे. म्हणूनच राष्ट्रपति पद त्यांच्याकडेच जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
भाजपकडून जेव्हा बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलं तेव्हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका निश्चित नव्हती. दलित मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांचं नावं पुढे केलं जातं आहे, असा आरोप शिवसेनेने केला होता. पण त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दर्शविला. शिवसेनेची 2.34 टक्के मतं रामनाथ कोविंद यांना मिळणार आहेत.
खरंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षासुद्धा रामनाथ कोविंद यांना समर्थन देतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण या दोन्हीही पक्षांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांना पाठिंबा दर्शविला आहे.
मीरा कुमार यांनी युपीएकडून उमेदवारी
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात विरोधी पक्षांतर्फे काँग्रेस नेत्या मीरा कुमार निवडणूक लढवणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. देशातील १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोविंद यांच्याप्रमाणेच मीरा कुमार याही दलित आहेत. त्यांच्या नावाला मायावती यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपाने दलित उमेदवार दिल्याने विरोधकही दलित चेहराच पुढे आणतील, हे निश्चित होते. अन्यथा दलित उमेदवाराला विरोध करीत असल्याची टीका त्यांच्यावर झाली असती. मीरा कुमार यांच्या निवडीचे हेही एक कारण आहे. माजी लोकसभाध्यक्ष असलेल्या मीरा कुमार या पूर्वी भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी होत्या. त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलै रोजी निवडणूक होणार, हेही स्पष्ट झाले. संसदेच्या ग्रंथालयात झालेल्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, शरद पवार, राजदचे लालूप्रसाद यादव हे हजर होते. यांच्याखेरीज डाव्या पक्षांतर्फे सीताराम येचुरी, डी. राजा, द्रमुकच्या खा. कणीमोळी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला हेही उपस्थित होते. तृणमूलच्या ममता बॅनर्जी, बसपाच्या मायावती व सपाचे अखिलेश यादव बैठकीला नव्हते. मात्र या तिन्ही पक्षांचे अनुक्रमे डेरेक ओ ब्रायन, सतीश मिश्रा व राम गोपाल यादव हजर होते.
जनता दल (सेक्युलर), क्रांतिकारी समाजवादी पक्ष, केरळ काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लीम लीग व अखिल आसाम युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट यांचेही प्रतिनिधीही बैठकीत होते.