भाजपावासी झालेल्या 200 मुस्लिमांना मशिदीत No Entry
By admin | Published: June 23, 2017 02:37 PM2017-06-23T14:37:02+5:302017-06-23T14:38:11+5:30
त्रिपुरातील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं जवळपास 25 कुटुंबातील 200 मुस्लिमांना मशिदीत प्रवेश करण्यावर बंदी आणली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - त्रिपुरातील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं जवळपास 25 कुटुंबातील 200 मुस्लिमांवर मशिदीत प्रवेश करण्यावर बंदी आणली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियातील सदस्यांनी या 200 मुस्लिमांना मशिदीत प्रवेश बंदी केली आहे. फक्त आणि फक्त मार्क्सवादी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन या मुस्लिम कुटुंबांनी भाजपा प्रवेश केला, म्हणून 25 कुटुंबांतील 200 मुस्लिमांना मशिदीत नो एन्ट्रीची #NoEntry कारवाई करण्यात आली आहे.
"जनसत्ता"नं दिलेल्या वृत्तानुसार, या मुस्लिम कुटुंबांवर मार्क्सवादी पार्टीमध्ये घरवापसी करण्यासाठीही दवाब टाकण्यात आला. इतकंच नाही तर भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी न दिल्यास त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात येईल, अशी धमकी दिली जात आहे. त्रिपुरातील शांतीबाजार परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. या 25 मुस्लिम कुटुंबातील 200 जणांनी मार्क्सवादी पार्टी सोडून भाजपाचं सदस्यत्व स्वीकारले आहे, त्यांना न केवळ मशिदीत जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे तर मनरेगामध्येही काम करण्यापासून वगळण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या 25 मुस्लिम कुटुंब भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी तेव्हाच रोखण्यात आलं जेव्हा त्यांनी मार्क्सवादी पार्टीला सोडचिठ्ठी दिली. मात्र, सर्वजण आपल्या निर्णयावर ठाम होते व त्यांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलं.
तर दुसरीकडे दक्षिण त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकारी सी.के. जमातिया यांनी सांगितले की, जर कुणी कोणाच्याही धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत असताना आढळले तर प्रशासन संबंधितांविरोधात कारवाई करू शकतो. दरम्यान, त्रिपुरात ईद पूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झालं आहे.
पुढच्या वर्षी त्रिपुरामध्ये आहेत निवडणुका
त्रिपुरामध्ये भाजपाचा आत्तापर्यंत कधीही प्रभाव नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1977 पर्यंत त्रिपुरामध्ये काँग्रेसचे सरकार होते. त्यानंतर डाव्यांचा प्रभाव या राज्यावर राहिलेला आहे. काँग्रेस आघाडीचा काही वर्षांचा अपवाद वगळता त्रिपुरामध्ये 1977 नंतर डाव्या पक्षांनी सरकार स्थापन केले आहे. सध्याही त्रिपुरात सलग पाचव्यांदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची सत्ता असून माणिक सरकार मुख्यमंत्री आहेत.
मात्र, नरेंद्र मोदींच्या विजयानंतर देशभरातली समीकरणे जशी बदलली, तसं त्रिपुरातलही बदलत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पंचायतीच्या निवडणुकांमध्ये कधी नव्हे ते भाजपाचे 4 उमेदवार निवडून आले. तर आगरतळा महापालिकेत भाजपाला 14 टक्के मते मिळाली. प्रत्यक्षात जागा फार मिळाल्या नसल्या तरी भाजपाचा जनाधार गेल्या दोन वर्षांमध्ये त्रिपुरात वाढला आहे आणि पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका असून भाजपा नक्कीच मुसंडी मारण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये त्रिपुरातील 200 मुस्लीम आकृष्ट होतात आणि त्यांना सत्ताधारी पक्ष मशिद प्रवेशाची बंदी घालतं हे उल्लेखनीय आहे. त्रिपुरामध्ये सुमारे 83.40 टक्के जनता हिंदू असून 8.40 टक्के मुस्लीम तर 4.35 टक्के ख्रिश्चन आहे.