सिक्कीम सीमेलगत कुमक वाढविली!

By admin | Published: July 3, 2017 05:29 AM2017-07-03T05:29:09+5:302017-07-03T05:29:09+5:30

सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले

Sikkim to form seamless community! | सिक्कीम सीमेलगत कुमक वाढविली!

सिक्कीम सीमेलगत कुमक वाढविली!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले सुमारे महिनाभर सुरू असलेली तणातणी आणि घुसखोरी करूनही चीनने घेतलेला उलटा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन भारताने तेथील आपली स्थिती बळकट करण्यासाठी सीमेवर लष्कराची जादा कुमक तैनात केली आहे.
अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. मात्र वाढीव सैन्य सीमेवर तैनात करणे याचा अर्थ युद्धाची तयारी करणे असा नाही. भारतीय सैन्य तेथे बंदुकींच्या नळ्या उलट्या दिशेला म्हणजे जमिनीकडे करून अनाक्रमक पवित्र्यात असतील, असे या सूत्रांनी आवर्जून स्पष्ट केले.
चीनने सिक्कीम सीमेवरील या घटनाक्रमाचे निमित्त पुढे करून नथु ला खिंडीतून जाणारी कैलास-मानसरोवर यात्राही अडवून ठेवली. त्यामुळे चीन भारताला जेरीस आणण्याचे प्रयत्न सर्व पातळ्यांवर करत असल्याचे दिसते. परंतु भारताने आपली खंबीर भूमिका कायम ठेवून या दबावाला भीक घातलेली नाही.

खुद्द लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही दिवसांपूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता, हेही लक्षणीय आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, चीन व देशांतर्गत अशांतता अशा अडीच आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर समर्थपणे सज्ज आहे, अशी ग्वाहीही जनरल रावत यांनी दिली होती.

डोका ला भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारीरिक रेटारेटी होऊन स्थिती गंभीर झाल्यावर भारतीय लष्कराने मेजर जनरल हुद्द्याच्या अधिकाऱ्याला तेथे पाठवून चीनच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्याशी ध्वजबैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. दोनदा नकार दिल्यावर तिसऱ्या वेळी चीन ध्वजबैठकीला आला. पण डोका लाच्या लालटेन भागातून भारतानेच सैन्य काढून घ्यावे, असा उफराटा प्रस्ताव त्याने दिला.

सिक्कीम सीमेवर सध्या उद््भवलेला तणाव हा १९६२ च्या युद्धानंतर भारत व चीन यांच्या सैन्यामध्ये सर्वात दीर्घकाळ सुरू राहिलेला तिढा आहे. विशेषकरून भारत आणि शेजारी भूतानने निषेध नोंदविल्यानंतर माघारी हटण्याऐवजी सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला आक्रमक पवित्रा, भारताचे सीमेवरील दोन बंकर नष्ट केले जाणे व चीनच्या राजनैतिक प्रतिक्रियेला चढलेली अधिक तिखट धार पाहता भारताने सावधानता म्हणून ही तयारी केली आहे.

मुजोर चीनने आणला नवा नकाशा


सिक्कीम सीमेलगतचा डोका ला हा प्रदेश आपल्याच हद्दीत आहे व तेथे आपण नव्हे तर भारतीय सैनिकांनीच घुसखोरी केली,
या आपल्या थापेबाजीला खरेपणाचा मुलामा चढविण्यासाठी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी बीजिंगमध्ये एक नवा नकाशा जारी केला.

या नकाशात सीमेलगत सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम थांबविण्यासाठी भारतीय सैनिक सीमा ओलांडून जेथून चीनच्या हद्दीत आले तो भाग निळ्या बाणांनी दाखविण्यात आला होता. हा वादग्रस्त रस्ता चीनच्या जागेत नव्हे तर आपल्या हद्दीत बांधला जात आहे, असे स्पष्ट करून भूतानने भारतासोबत या दादागिरीचा निषेध केला.

Web Title: Sikkim to form seamless community!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.