हिंदू, मुस्लिम एकत्र राहणं अमान्य, दांपत्याला रुम देण्यास हॉटेलचा नकार
By admin | Published: July 5, 2017 01:12 PM2017-07-05T13:12:48+5:302017-07-05T13:20:41+5:30
केरळमधील एका दांपत्याला त्यांचा धर्म वेगळा असल्याने रुम नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 5 - भारतीय संस्कृतीत पाहुण्याला देवाचं स्थान देण्यात आलं आहे. "अतिथी देवो भव" म्हणत येणा-या पाहुण्याचं स्वागत केलं जातं. मात्र बंगळुरुमधील एका हॉटेलला आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला दिसत आहे. केरळमधील एका दांपत्याला त्यांचा धर्म वेगळा असल्याने रुम नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी हैदराबादमध्ये एका महिलेला सिंगल असल्याने रुम नाकारण्यात आली होती. त्याच्या दोन आठवड्यानंतर आता ही घटना समोर आली आहे.
आणखी वाचा -
शफीक शुबैदा हक्कीम आणि दिव्या असं या दांपत्याचं नाव आहे. ते केरळचे राहणारे आहेत. बंगळुरुमधील सुदामा नगर येथे अन्निपुरम मेन रोडवर असणा-या ऑलिव्ह रेसिडेन्सी हॉटेलमध्ये हा विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. दांपत्याने दिलेल्या माहितीनुसार, रिसेप्शनिस्टने दोघांचेही ओळखपत्र पाहिल्यानंतर रुम नाकारली असल्याचा दावा केला आहे.
"त्याने आमची नावं रजिस्टरवर नोंद केली असता मी मुस्लिम असून, माझी पत्नी हिंदू असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आम्हा दोघांचाही धर्म वेगळा असल्याने तुम्ही विवाहित आहात का अशी चौकशी त्याने केली. आम्ही रितसर पद्धतीने लग्न केलं असल्याचं त्याला सांगितलं. यानंतर त्याने आम्हाला रुम देण्यास थेट नकार दिला. हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहणं मान्य नसल्याचं सांगत त्याने रुम देऊ शकत नाही सांगितलं", अशी माहिती शफीक शुबैदा हक्कीम यांनी न्यूज मिनिटशी बोलताना दिली आहे.
याआधी नुपूर सारस्वत नावाच्या महिलेला हैदराबादमधील हॉटेल डेक्कन एरागड्डाने रुम देण्यास नकार दिल्याची घटना समोर आली होती. नुपूर सारस्वत भारतीय वंशाच्या कलाकार असून सिंगापूरला राहतात. नुपूर सारस्वत एकट्याच असल्याने त्यांना रुम देण्याच आली नव्हती. हॉटेलच्या नियमांनुसार ते स्थानिक, अविवाहित दांपत्य आणि एकट्या महिलांना रुम देत नाहीत.
आपल्याला आलेल्या या अनुभवामुळे संतप्त झालेल्या नुपूर सारस्वत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपबीती सांगितली. त्यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर गोबिबोने त्यांची माफी मागितली. कारण नुपूर सारस्वत यांनी गोबिबोच्या माध्यमातूनच सर्व रिझर्व्हेशन्स केली होती. आम्ही अशा प्रकरणांची गंभीरतेने दखल घेतो, आणि चौकशी होईल असं आश्वासन गोबिबोने दिलं आहे.
याआधीही अशीच काहीशी घटना दिल्लीत पहायला मिळाली होती. राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा उत्तर पुर्वेकडील महिलेसोबत भेदभाव केल्याची घटना समोर आली होती. आपला पारंपारिक पोषाख घालून आल्याने मेघालयमधील एका महिलेला दिल्लीमधील गोल्फ क्लबने बाहेर काढल्याची लज्जास्पद घटना समोर आली होती. ही घटना समोर आल्यानंतर लोकांकडून मोठ्या प्रमाणात निषेध होऊ लागला. यानंतर गोल्फ क्लबने माफी मागितली होती.