अवघ्या 2 रुपयांत अजय सिंगनी विकत घेतली स्पाइसजेट विमान कंपनी

By admin | Published: July 7, 2017 12:23 PM2017-07-07T12:23:48+5:302017-07-07T12:23:48+5:30

तोट्यात असलेली स्पाइसजेट ही लो कॉस्ट कॅरीअर अजय सिंग यांनी कलानिधी मारन यांच्याकडून अवघ्या 2 रुपयांमध्ये विकत घेतली

SpiceJet Aircraft Company bought Ajay Singh for only 2 rupees | अवघ्या 2 रुपयांत अजय सिंगनी विकत घेतली स्पाइसजेट विमान कंपनी

अवघ्या 2 रुपयांत अजय सिंगनी विकत घेतली स्पाइसजेट विमान कंपनी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - तोट्यात असलेली स्पाइसजेट ही लो कॉस्ट कॅरीअर अजय सिंग यांनी कलानिधी मारन यांच्याकडून अवघ्या 2 रुपयांमध्ये विकत घेतली. दिल्ली उच्च न्यायालयात सिंग व मारन यांच्यात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान ही बाब समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी 2015मध्ये या दोघांमध्ये झालेल्या करारानुसार स्पाइस जेटमधील मारन यांचे 35 कोटी शेअर किंवा 58.5 टक्के भागीदारी सिंग यांनी मारन यांच्या काल एअरवेजकडून 2 रुपयांना विकत घेतली.
एका अर्थी कदाचित हा जगातला सगळ्यात किमतीचा सौदा वाटू शकेल, कारण हा करार झाला त्यावेळी मारन यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य 765 कोटी रुपये होते. आजचा विचार केला तर स्पाइसजेटचा भाव वधारला असून प्रति समभाग किंमत 120 रुपये आहे, त्यामुळे अजय सिंगनी विकत घेतलेल्या त्या शेअर्सची आजची किंमत 4,400 कोटी रुपये आहे. परंतु, त्याची दुसरी बाजू म्हणजे ज्यावेळी हा सौदा झाला त्या आधीच्या आर्थिक वर्षात 2014-15 मध्ये स्पाइसजेटला 687 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यावर्षी कंपनीचे एकूण नुकसान 1,329 कोटी रुपयांचे होते तर कंपनीच्या डोक्यावर 1,418 कोटी रुपयांचे कर्ज होते.
आर्थिक डबघाईमुळे बंद पडण्याच्या मार्गावर असलेली स्पाइसजेट सिंग यांनी तिच्या डोक्यावर असलेल्या सगळ्या कर्जासकट व देण्यांसकट विकत घेतली. त्यासाठी त्यांनी मारन यांना त्यांच्या हिश्शापोटी अवघा 2 रुपयांचा नजराणा दिला. स्पाइसजेट ताब्यात घेतल्यानंतर मात्र, अजय सिंगनी आपलं कौशल्य पणाला लावलं आणि तोट्यातल्या कंपनीला नफ्यात आणलं. एवढंच नाही तर नव्या विमानांसाठी कंपनीने बोइंगला ऑर्डर दिली असून त्याचा उल्लेख अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नुकताच केला आहे.
 
 
13 जानेवारी 2017 रोजी स्पाइसजेट व बोइंग यांच्यात एक करार झाला. स्पाइस जेटचे चेअरमन अजय सिंग, बोइंगचे व्हाइस चेअरमन रेमंड कॉनर व बोइंगचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट सेल्स दिनेश केसकर यांच्यात बोइंगची 205 विमानं स्पाइसजेट 22 अब्ज डॉलर्सना खरेदी करेल असा करार झाला.
 
स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांनी मात्र, सिंग यांनी 2 रुपयांत कंपनी विकत घेतली असा अर्थ काढणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जर ही कंपनी तिच्या डोक्यावरील कर्ज व देणी यांच्यासकट विकत घेतली असेल तर कराराची किंमत 2 रुपये नाही तर ती देणी व कर्ज धरून झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
संपूर्णपणे बुडत असलेली स्पाइसजेट 17 डिसेंबर 2014 पासून आपण बंद करत आहोत, तरी सगळी उड्डाणे रद्द करण्याची परवानगी द्या अशी मागणी करणारे पत्र मारन यांनी 16 डिसेंबर 2014 रोजी केंद्र सरकारला लिहिले होते, मात्र, नंतर चक्रे फिरली आणि भाजपाचे खंदे समर्थक असलेल्या अजय सिंग यांनी स्पाइसजेट विकत घेतली आणि तिला नफ्यात आणून दाखवले.
जवळपास 3,500 कोटी रुपयांचा बोजा डोक्यावर त्यावेळी होता, त्यापैकी 2,200 कोटी रुपये ताबडतोब लागणार होते. त्यामुळे मारन यांनी अवघ्या 2 रुपयांत सगळ्या देण्या-कर्जांसकट स्पाइस जेट अजय सिंगना विकायचा निर्णय घेतला. स्पाइसजेटची गत किंगफिशरसारकी होऊ नये म्हणून केंद्र सरकारनेही या सौद्यासंदर्भात सहकार्याची भूमिका घेतली. अवघ्या दोन आठवड्यात संपूर्णकंपनीची सूत्रे मारन यांच्याकडून सिंग यांच्या हातात गेली, त्यासाठी सेबीच्या काही नियमांमधूनही सूट देण्यात आली होती.
दिल्ली उच्च न्यायालयात आलेल्या या प्रकरणात मात्र चर्चा रंगतेय ती अजय सिंग यांनी अवघ्या 2 रुपयांत स्पाइसजेट मारन यांच्याकडून विकत घेतली याचीच!
 
आणखी वाचा...
चार्जिंगला बाय बाय! आता बॅटरी नसलेला फोन
आश्चर्य.. रोबोटने वाचवले कपाटाखाली सापडणाऱ्या मुलीला
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग बनवणाऱ्यांना येणार अच्छे दिन

Web Title: SpiceJet Aircraft Company bought Ajay Singh for only 2 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.