कळत नाही मोदींनी तुम्हाला मुख्यमंत्री का बनवलं? राखी सावंतची योगींवर टीका
By Admin | Published: July 9, 2017 06:06 PM2017-07-09T18:06:31+5:302017-07-09T19:00:48+5:30
वादग्रस्त विधानं करून नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी राखी सावंतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - वादग्रस्त विधानं करून नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी राखी सावंतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी लागणारे कोणतेच गुण आदित्यनाथ यांच्याकडे नाहीत, कळत नाही तुमचे कोणते गुण पाहून पंतप्रधान मोदींनी तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं अशा शब्दांमध्ये राखी सावंतने योगींवर खरमरीत टीका केली.
मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राखी सावंतने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर चौफेर हल्ला चढवला. कत्तलखाने बंद करण्याच्या योगी आदित्यनाथांच्या निर्णयाला राखीने यावेळी कडाडून विरोध केला. मुसलमानांनी बीफ खाऊ नये हे सांगण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला असा सवालही तिने उपस्थित केला आहे. नेहमी वादामध्ये राहणारी राखी आदित्यनाथांचा उल्लेख करताना पुढे म्हणाली, जर तुम्ही स्वतः हिंदू आहात तर तुम्ही इतर सगळ्यांना हिंदू बनवू शकत नाही. ज्याप्रकारे मुसलमान तुमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्याप्रमाणे तुम्हीही त्यांच्या मुद्द्यांपासून दूर रहावं. हिंदू लोकं मुस्लिमांना दगडाने ठेचून मारत आहेत हा कोणता न्याय आहे योगी जी असा सवाल तिने केला.
हे बोलताना राखीने आदित्यनाथांना 20 वर्षांपर्यंत खुर्चीत बसण्यासाठी मुसलमानांसोबतच सर्व धर्मीयांची साथ द्यावी, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण करावं, केवळ हिंदूंची जय-जय करून चालणार नाही असा सल्लाही राखीने देऊन टाकला. याबाबतचा एक व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ-
दरम्यान 7 जुलै रोजी अभिनेत्री राखी सावंत बुरखा परिधान करुन लपूनछपून गुरुवारी पंजाबमधील लुधियाना कोर्टात हजर झाली होती. रामायणकार वाल्मिकी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर राखी सावंतविरोधात लुधियाच्या न्यायदंडाधिकारी कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टात हजर झाल्यानतंर न्यायाधीश विश्व गुप्ता यांनी राखी सावंतला जामीन मंजूर केला. राखी सावंतविरोधात 2 जून रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. वारंवार समन्स बजावूनही राखी 9 मार्चला सुनावणीसाठी कोर्टात हजर न राहिल्याने तिला समन्स बजावण्यात आलं होतं.