प्रत्येक काश्मिरीची मान शरमेने खाली गेली आहे - मेहबूबा मुफ्ती
By admin | Published: July 11, 2017 08:24 AM2017-07-11T08:24:59+5:302017-07-11T08:27:28+5:30
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी अमरनाथ यात्रेकरुच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना हा सर्व मुस्लिम आण काश्मिरींवर एक डाग असल्याचं म्हटलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 11 - मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी अमरनाथ यात्रेकरुच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना हा सर्व मुस्लिम आण काश्मिरींवर एक डाग असल्याचं म्हटलं आहे. अनंतनाग येथे रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यावर त्यांनी या घटनेमुळे काश्मिरींची मान शरमेने खाली झुकली असल्याचं सांगितलं आहे. "इतक्या अडचणी असतानाही यात्रेकरु दरवर्षी काश्मीरमध्ये येतात. आज सात लोकांचा मृत्यू झाला आहे. माझ्याकडे याचा निषेध करण्याशिवाय दुसरं काही नाही. सुरक्षा जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस कट रचणा-यांना अटक करुन कारवाई करतील अशी अपेक्षा आहे", असं मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. "ही घटना सर्व काश्मिरी आणि मुस्लिमांवर एक डाग आहे. आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही", असंही त्यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या
दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिला यात्रेकरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
#WATCH: Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti speaks on #Anantnag terror attack targeting #AmarnathYatra pilgrims. pic.twitter.com/SKtcJaK56r
— ANI (@ANI_news) July 10, 2017
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
Terror attack: Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti meets the injured #AmarnathYatra pilgrims in Anantnag hospital. pic.twitter.com/94cjM7CgXy
— ANI (@ANI_news) July 10, 2017
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एसओजी आणि सीआरपीएफच्या निगराणीखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याचा तपशील मागवला.
#WATCH: Scenes from the hospital in J&K"s Anantnag where injured #AmarnathYatra pilgrims have been admitted post terror attack pic.twitter.com/Kdn54adES5
— ANI (@ANI_news) July 10, 2017
नियमांचे उल्लंघन
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रापूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.
१७ वर्षांपूर्वीही झाले होते हत्याकांड
अमरनाथ यात्रेवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी सन २००० च्या यात्रेत जुलै महिन्यात अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या पहेलगाम येथील बेस कॅम्पवर बॉम्ब फेकून व बेछुट गोळीबार करून केलेल्या हल्ल्यात २७ यात्रेकरू ठार तर ३६ जखमी झाले होते. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.