स्वसंरक्षणासाठी भारत पूर्णपणे सज्ज - सुषमा स्वराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:11 AM2017-07-21T04:11:03+5:302017-07-21T06:57:58+5:30
चीनकडून गेल्या काही दिवसांपासून युद्धाची भाषा केली जात असली तरी, भारत आपले संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चीनकडून गेल्या काही दिवसांपासून युद्धाची भाषा केली जात असली तरी, भारत आपले संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत गुरुवारी स्पष्ट केले.
भारत, चीन आणि भूतानच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात, त्या ट्राय जंक्शनच्या भूभागातील परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून चीन ट्राय जंक्शनच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होता.
चिनी सैन्य १६ जून रोजी ट्राय जंक्शन जिथे समाप्त होते, तिथे बुलडोझर आणि बांधकाम साहित्य घेऊन पोहोचले. चीनकडून तिथे रस्तेबांधणीचे काम झाले तर थेट भारताच्या सुरक्षेलाच धोका निर्माण होईल, असे सुषमा स्वराज म्हणाल्या. चीनच्या या निर्णयामुळे दोन देशांत तणाव निर्माण झाला असला तरी अनेक देशांचा भारताला पाठिंबा आहे, असा दावाही परराष्ट्रमंत्र्यांनी केला. त्या म्हणाल्या की या संपूर्ण वादात भारताने कुठलीही अनावश्यक टिप्पणी केलेली नाही.
भारत सर्व बाजूंनी घेरला गेला आहे, असे सांगणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की, भारत स्वसंरक्षणासाठी अतिशय सज्ज असून कोणीही भारताला घेरण्याचा प्रयत्न करूच शकत नाही, असे सांगून स्वराज म्हणाल्या की दक्षिण समुद्राबाबतीतही भारताची भूमिका स्पष्ट आहे. तिथून व्यापार आणि वाहतूक करण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे. त्याविषयी मतभेद असतील तर संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कायद्याच्या आधारे तो प्रश्न सोडवावा, असे भारताचे म्हणणे आहे.
चिनी सैन्य तैनात नाही...
लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या पट्ट्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्याचे वृत्त भारताने फेटाळून लावले आहे. तिबेटमध्ये चिनी लष्कर कोणताही युद्ध सराव करीत नसल्याचेही भारतीय सूत्रांनी म्हटले आहे.
तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून सुषमा स्वराज म्हणाल्या
की, भारतीय सैन्याने डोकलाममधून माघार घ्यावी अशी चीनची मागणी आहे. पण त्याचवेळी चीननेही तिथून माघार घ्यायला हवी, अशी आपली भूमिका आहे, असे स्वराज म्हणाल्या.
चीनच्या वन बेल्ट,
वन रोड प्रकल्पासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भारताने सुरुवातीपासून या प्रकल्पाला विरोध केला आहे.