बुर्ज खलिफापेक्षा उंच छत्रपती शिवाजी कन्व्हेन्शन सेंटर मुंबईत बांधायचंय - नितिन गडकरी
By Admin | Published: October 31, 2015 04:55 PM2015-10-31T16:55:44+5:302015-10-31T16:55:44+5:30
बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत मुंबईमध्ये उभारण्याचं माझं स्वप्न असून तीस मजले रेस्टॉरंट्स, तीस मजले हॉटेल्स, १५ हजार गाड्यांसाठी पार्किंग अशा भव्य या वास्तुचं नाव
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - दुबईमधल्या बुर्ज खलिफापेक्षा उंच इमारत मुंबईमध्ये उभारण्याचं माझं स्वप्न असून तीस मजले रेस्टॉरंट्स, तीस मजले हॉटेल्स, १५ हजार गाड्यांसाठी पार्किंग अशा भव्य या वास्तुचं नाव छत्रपती शिवाजी महाराज कन्व्हेन्शन सेंटर असेल असं केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले.
मुंबईमध्ये यापुढे औद्योगिक वाढ होण्यास वाव नसल्याचं माझं स्पष्ट मत असून बीपीसीएल, एचपीसीएल व आरसीएफ सारखे प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये न्यावेत असा माझा प्रस्ताव आहे. यामुळे सिंधुदुर्गामध्ये मराठी माणसांना रोजगार मिळेल, त्या परीसराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करायचा माझा विचार आहे. यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होईल असे नितिन गडकरी म्हणाले.
वर्षपूर्तीनिमित्त आयबीएन लोकमतच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
मुंबई पुणे एक्स्प्रेसवेप्रमाणे मुंबई बडोदा, मुंबई नागपूर एक्स्प्रेसवे बांधण्याचा आमचा प्रस्ताव असून मुंबई गोवा हायवे दोन वर्षांमध्ये चारपदरी करण्यात येईल असे गडकरी म्हणाले.