कपिल शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये दाखल होणार पुतळा
By Admin | Published: March 18, 2016 11:36 AM2016-03-18T11:36:14+5:302016-03-18T11:47:47+5:30
मादाम तुसाँच्या वॅक्स स्टॅच्यू किंवा मेणाच्या पुतळ्यांच्या म्युझियममध्ये कपिल शर्माचा पुतळा दाखल होणार आहे
ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. १८ - छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात करणारा कपिल शर्मा अल्पावधीतच कॉमेडी नाईट्स विथ कपिलमुळे घराघरात पोहोचला. त्यानंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आपल्या बॉलिवूड करिअरलादेखील सुरुवात केली.
फोर्ब्सच्या भारतीय सेलिब्रेटींच्या यादीत नाव झळकल्यानंतर आता तर कपिल शर्माचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल कारण मादाम तुसाँच्या वॅक्स स्टॅच्यू किंवा मेणाच्या पुतळ्यांच्या म्युझियममध्ये कपिल शर्माचा पुतळा दाखल होणार आहे.
एका मनोरंजन वेब पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्यासाठी म्युझियमचे जे कलाकार आले होते त्यांनीच कपील शर्माचीदेखील भेट घेतली. म्युझिअमच्या कलाकारांनी कपील शर्माचेदेखील मोजमाप घेतले. मुंबईतील जे डब्ल्यू मॅरिअट हॉटेलमध्ये ही भेट झाली. म्युझिअमच्या कलाकारांनी पुतळा बनवण्याच्या कामाला सुरुवात केली असून सहा महिन्यात हा पुतळा तयार होईल. आणि त्यानंतर लगेच त्याची माहिती दिली जाईल.
कपिल शर्मा छोट्या पडद्यावरील पहिला सेलिब्रेटी असणार आहे ज्याचा पुतळा मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये लागणार आहे. मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये अनेक सेलिब्रेटींचे पुतळे आहेत ज्यामध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, कतरिना कैफ, करिना कपूर, ह्रतिक रोशन आणि माधुरी दिक्षित यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. आता यांच्यासोबत कपिल शर्माचा पुतळादेखील लागेल. महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळादेखील मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये लागणार आहेे. काही दिवसांपुर्वी म्युझिअमच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.
On your demand we have to reveal the pics of " Kapil Statue At Madame Tussauds " pic.twitter.com/Y0yHFxd77o— Kapil Sharma FC (@KapilFans) March 17, 2016