फकीर बनून सोनू निगमने रस्त्यावर गायले गाणे, कमावले १२ रुपये...
By Admin | Published: May 18, 2016 06:45 AM2016-05-18T06:45:09+5:302016-05-18T12:20:19+5:30
बॉलिवूडमधील टॉपचा पार्श्वगायक असलेल्या सोनू निगमने एक वेगळा प्रयोग करताना वेष बदलून रस्त्यावर गाणे गायले आणि आश्चर्य म्हणजे कोणीही त्याला ओळखू शकले नाही...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक आणि अभिनेता सोनू निगम रस्त्याच्या बाजूला बसून गाणं गातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायलर झालाय. त्यामुळे सोनू चर्चेत आला. एखाद्या सेलिब्रिटीने वेष बदलून रस्त्यावर बसून गाणं गाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या व्हिडीओला सोनूनं 'द रोडसाइड उस्ताद' असं नावही दिलंय. हा व्हिडीओ यू ट्युबवरही टाकण्यात आलाय. रस्त्यावरील वयोवृद्ध गायकाला गाताना पाहून लोक काय प्रतिक्रिया देतात हे जाणून घेण्यासाठीच हा व्हिडीओ बनवण्यात आला होता.
सोनू एका म्हाता-या माणसाच्या रुपात मुंबईतील विविध ठिकाणी रस्त्यावर पथारी पसरून आपल्या सुरेल आवाजात गात असून अनेक जण त्याचं गाणं तल्लीन होऊन ऐकत आहेत, असं या व्हिडीओत दिसत आहे. एवढचं नव्हे तर एका युवकाला त्याचा आवाज एवढा आवडला की त्याने गाण्याचे रेकॉर्डिंगही केले. गाणं संपल्यानंतर त्या युवकाने म्हाता-याच्या वेषातील सोनूच्या आवाजाची खूप तारीफ केली. त्याची प्रेमाने विचारपूस करत तो जेवला आहे का असं विचारत त्या युवकाने त्याला काही पैसेही दिले.
त्या तरूणाच्या या कृतीमुळे सोनू भारावून गेला. ' मला ओळखत नसतानाही त्या तरूणाने माझी एवढी प्रेमाने विचारपूस केली, मला १२ रुपये दिले. त्याचं ते प्रेम, कृती पाहून मला एवढआ आनंद झाला, मला असं वाटलं की मी लाखो रुपये मिळवले आहेत. ते पैसे माझ्यासाठी अनमोल असून माझ्या ऑफीसमधील सहका-यांना मी ते पैसे फ्रेम करून जपून ठेवण्यास सांगितलं आहे' अशा शब्दांत सोनूने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
मी स्वतःला हरवून या व्हिडीओसाठी रस्त्यावर गाणं गायलं. मी कसा दिसेन याचा त्यावेळी विचार केला नव्हता. मेकअपमुळे लोक मला ओळखू शकणार नाहीत हे मला माहीत होतं, असंही सोनूने सांगितलं.
तसेच व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना संगीताबाबत आवड निर्माण करण्याचा हेतू असल्याचं मत कल्चर मशिनचे प्रमुख आणि या व्हिडीओचे निर्माता कार्ल कॅटगेरा यांनी मांडलं आहे. या व्हिडीओसाठी सोनू निगमहून दुसरा कोण चांगला गायक असणार, असंही कार्ल कॅटगेरा म्हणाले.