सेन्सॉर बोर्ड अतिरेक करतंय?
By admin | Published: June 10, 2016 01:03 AM2016-06-10T01:03:06+5:302016-06-10T01:03:06+5:30
सेन्सॉर बोर्डाने ‘उडता पंजाब’ चित्रपटाचे नाव व त्यातील दृश्यांवर आक्षेप घेऊन त्यावर कात्री चालवल्याच्या निर्णयावर टीका होत आहे.
पुणे : पंजाब राज्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे कारण देत सेन्सॉर बोर्डाने ‘उडता पंजाब’ चित्रपटाचे नाव व त्यातील दृश्यांवर आक्षेप घेऊन त्यावर कात्री चालवल्याच्या निर्णयावर टीका होत आहे. सेन्सॉर बोर्ड विनाकारण अतिरेक करीत असल्याचे या क्षेत्रातील मान्यवरांनी म्हटले आहे.
अनुराग कश्यपच्या आगामी ‘उडता पंजाब’ चित्रपटातील तब्बल ८९ दृश्यांवर कात्री चालवण्याचा निर्णय घेतल्याने अनुरागने हायकोर्टात याचिका दाखल केली. सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त होत आहे. चित्रपट दिग्दर्शक, सेन्सॉर बोर्ड यांच्यातील वाद अनेक वर्षांपासून चालत आले आहेत. आता मात्र, जाचक नियमांचा अतिरेक होत आहे. एखादी कलाकृती साकारताना स्वातंत्र्य घ्यावेच लागते; पण त्यात मर्यादाही पाळायला हव्यात, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
सेन्सॉरशिपविषयी नुसतं बोललं जातं, ज्याच्याविरुद्ध बोललं जातं त्यालाच सगळं सहन करावं लागतं. इतर कुणीही याविरुद्ध लढा देत नाही. कुणी सेन्सॉरशिप हवी आहे का नको, याविरूद्ध का एक अक्षरही उच्चारत नाही? गेली 3० वर्षे मी सेन्सॉरशिपविरुद्ध एकट्याने लढा देत आहे, या सेन्सॉरशिपविरोधात चळवळ का उभी केली जात नाही? हाच माझा सवाल आहे.
- अमोल पालेकर (आॅस्कर चित्रपट
निवड समितीचे अध्यक्ष आणि अभिनेते)
सेन्सॉरशिप हा एक राजकीय मुद्दा बनत चालला आहे. घाशीराम कोतवालपासून हा प्रश्न उपस्थित होतो आहे. इथे प्रत्येक जण स्वत:चा फायदा पाहतो आहे. कोणत्याही विषयावर चर्चा नीट होत नाही. संसदेत लोकप्रतिनिधी एखाद्या नळावर भांडल्यासारखे चर्चा करतात. आज सोशल नेटवर्किंग साईटवरदेखील कुणाचे नियंत्रण राहिलेले नाही. मात्र, यावर कुणीच भाष्य करीत नाही. सेन्सॉर बोर्डासाठी एक स्वतंत्र नियमावली निश्चित होणे आवश्यक आहे. तरच, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुसूत्रता येऊ शकेल.
- डॉ. मोहन आगाशे ( ज्येष्ठ अभिनेते)
>सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्यामध्ये मोठ्या काळापासून वाद सुरू आहेत. दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटाच्या कथानकातून काय सांगायचे आहे? तो उगीचच ताशेरे ओढत नाही ना? याची तपासणी करणे, सेन्सॉर बोर्डाचे नियम कशा प्रकारे लागू केले जातात, याचा सखोल अभ्यास आवश्यक आहे.
- राजदत्त (चित्रपट दिग्दर्शक)
अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे; पण देशद्रोही गोष्टींना खतपाणी मिळता कामा नये. एखाद्या विषयातून जनजागृती होत असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे. ‘उडता पंजाब’मध्ये सेन्सॉरने ८९ कट सुचविले आहेत; पण यापूर्वी शांता शेळके सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा असताना दादा कोंडके यांच्या चित्रपटाला १५० कट त्यांनी सांगितले होते; पण दादांनी स्वत: समोर बसून त्यांना प्रिव्ह्यू दाखवून ते २२ वर आणले होते. अनुराग कश्यपनेही हे पाऊल उचलावे.
- राहुल सोलापूरकर (अभिनेते)
समाजात तेढ पसरवणारे, प्रक्षोभक किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह कलाकृती असेल तर ते समजू शकतो; पण कथा ज्या भागाची आहे, तो शब्द कसा वगळला जाऊ शकतो. तो शब्द विषयाशी निगडित आहे.
- अनिल झणकर
(चित्रपट समीक्षक-अभ्यासक)
‘उडता पंजाब’मधील ‘पंजाब’ हा शब्द स्थानिक विषयाचे प्रतिनिधित्व करतो. चित्रपट अमली पदार्थाच्या विषयाशी निगडित आहे. मुळात असे सामाजिक विषय हाताळताना तेच त्याच अँगलने दाखवणे अपेक्षित आहे; पण तसे होत नाही आणि सेन्सॉरनेही त्यात ८९ कट सुचविले, तर काहीच कोणी करू शकणार नाही. एखादी कलाकृती साकारताना थोडे स्वातंत्र्य हे घ्यावेच लागते; पण त्यामध्ये मर्यादाही पाळल्या गेल्या पाहिजेत.
- अश्विनी गिरी (अभिनेत्री आणि
मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्ड सदस्य)
>सेन्सॉर बोर्डाचे काम हे चित्रपटाला दर्जा देण्याचे काम आहे. तो ए असेल किंवा यूए, त्याला चित्रपटाला कात्री लावण्याचा कोणताही अधिकार नाही. या सरकारने सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून त्यांची विचारसरणी असणारे चित्रपट जनतेसमोर आणण्याचा कुटिल डाव आखला आहे. परंतु, आम्ही हे कदापि सहन करणार नाही. आमचा सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाला तीव्र विरोध आहे.
- विकास अर्स (एफटीआयआय विद्यार्थी)
एखाद्या चित्रपटावर गरजेपेक्षा जास्त आक्षेप घेणे, हा सेन्सॉर बोर्डाचा अतिरेकच म्हणायला हवा. मीही अनेकदा माझ्या चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डाशी भांडलो आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. कलाकृती निर्माण करताना त्यांनी अक्षरश: जीव ओतलेला असतो. जाचक नियम लादल्यास निर्माता-दिग्दर्शकांची अडचण होते.
- महेश मांजरेकर (चित्रपट दिग्दर्शक)
सेन्सॉर बोर्डाच्या जाचक नियमावलीचा फटका याआधी मराठी चित्रपटांनाही सहन करावा लागला आहे. ही नियमावली चित्रपटसापेक्ष आहे की काय, अशी शंका निर्माण होते. काही चित्रपटांसाठी नियम शिथिल केले जातात, तर काही चित्रपटांसाठी कठोरपणे पाळले जातात, हे गणित समजण्यापलीकडचे आहे. दिग्दर्शकाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम केले जाते.
- मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, चित्रपट महामंडळ
एखादे राज्य, व्यक्ती, संघटना, यांवरून कला माध्यामातून झालेल्या टीका अथवा चेष्टेतून, त्या विशिष्ट राज्याच्या, व्यक्तीच्या, संघटनेच्या विचारसरणीशी असलेल्या एकनिष्ठतेची परीक्षा होत असते. अशा प्रकारच्या चर्चेतूून, टीकेतून, अथवा दृश्यांतून सतत भावना दुखावल्या जात असतील आणि खुर्च्या धोक्यात येत असतील, तर कुठे तरी विचारसरणीतच गडबड आहे, असे म्हणावे लागेल. - धर्मकीर्ती सुमंत (नाटककार)