VIDEO : बंगळुरूच्या घटनेनं माझं रक्त खवळलं - अक्षय कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2017 12:36 PM2017-01-05T12:36:33+5:302017-01-05T13:31:36+5:30
बंगळुरुमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या महिला - तरुणींची छेड काढल्याच्या प्रकरणावरुन देशभरात संतापाची लाट उसळली असताना अभिनेता अक्षय कुमारनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - बंगळुरुमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या तरुणी-महिलांची छेड काढल्याच्या प्रकरणावरुन देशभरात संतापाची लाट उसळली असताना अभिनेता अक्षय कुमारनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. खिलाडी अक्षय कुमारने एक व्हिडीओ शेअर करुन या घटनेवरुन खडेबोल सुनावले आहेत. विमानतळावरुन घरी जात असताना टीव्हीवर ही बातमी पाहिल्यानंतर आपलं रक्त उसळल्याचं अक्षय कुमार बोलला आहे. यावेळी अक्षय कुमारने या घटनेसाठी महिलांनाच जबाबदार धरणा-यांनाही चांगलंच धारेवर धरले. उद्या तुमच्या बहिणी किंवा मुलीशीही असं असभ्य वर्तन झाल्यास असंच बोलणार का? असा सवालही अक्षय कुमारने अशा घटनांसाठी मुलींनाच जबाबदार धरणा-यांना विचारला आहे.
अक्षय कुमारने तरुणी आणि महिलांनाही अलर्ट राहण्याचं तसंच मार्शल आर्ट, आत्मसंरक्षणाचे धडे घेण्याचंही आवाहन केले आहे. तसंच जो कुणी तुम्हाला कसे वागायचे, कसे कपडे घालायचे, असा सल्ला देत असेल त्या व्यक्तिला तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, असं सुनवायला विसरु नका असंही त्याने सांगितले. एकूणच खिलाडी अक्षय कुमारचा संताप किती अनावर झाला आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे.
काय आहे घटना -
31 डिसेंबरच्या रात्री एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन करण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. रात्री 11 वाजता काही हुल्लडबाजांनी महिलांना हात लावण्यास आणि टिप्पणी करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे परिसरात 1500 पोलीस तैनात असतानाही हा प्रकार घडला. या घटनेचे फोटो समोर आले असतानाही कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
हुल्लडबाजांनी अर्धी रात्र झाल्यानंतर सगळ्या सीमा पार केल्या आणि महिलांना हवं तिथे स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलांचा विनयभंग होत होता. परिस्थिती एवढी बिघडली होती की जमलेल्या तरुणी, महिलांनी सँडल, चपला हातात घेऊन मदतीसाठी धावण्यास सुरुवात केली.
कोणताही गुन्हा नोंद नाही -
घटनेचे फोटो समोर आल्यानंतर तसंत प्रत्यक्षदर्शी असतानाही पोलिसांनी मात्र अजून कोणताच एफआयआर दाखल झालं नसल्याचं सांगितलं होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपायुक्त संदिप पाटील यांनी 'महिलांची कुटुंबियांशी चुकामूक झाली होती, त्यांचा शोध लागत नसल्याने मदत मागत होत्या,' असा दावा केला आहे. विनयभंगाचा कोणताच गुन्हा दाखल केला गेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
महिलांचे कपडे काढून केला विनयभंग -
सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी दिलेली माहिती मात्र वेगळीच होती. चर्च मार्गावर तैनात एका महिला पोलिसाने 'काही हुल्लडबाजांनी दारुच्या नशेत असलेल्या महिलेचे कपडे काढून तिची छेड काढल्याचं', सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमजी आणि ब्रिगेड रोडवर 1500 पोलीस कर्मचारी तैनात होते.
नेत्यांची जीभ घसरली -
कर्नाटकचे मंत्री जी परमेश्वर यांच्यासोबतच अबू आझमी यांनी महिलांनी तोकडे कपडे घातले की अशा घटना होतात असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे.