ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा स्मृतिदिन

By Admin | Published: January 13, 2017 10:05 AM2017-01-13T10:05:29+5:302017-01-13T10:05:29+5:30

लखोबा लोखंडे असो किंवा इतर स्मरणीय भूमिका, रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर उर्फ पंत यांचा आज (१३ जानेवारी) स्मृतिदिन.

Remembrance Day of senior actor Prabhakar Panashikar | ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा स्मृतिदिन

ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा स्मृतिदिन

googlenewsNext
>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १३ - ' तो मी नव्हेच'मधील लखोबा लोखंडे असो किंवा इतर स्मरणीय भूमिका, रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर उर्फ पंत यांचा आज (१३ जानेवारी) स्मृतिदिन.
 
प्रल्हाद केशव अत्रेलिखित 'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. 'इथे ओशाळला मृत्यू' ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखील पंतानी अजरामर केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीत नाटक नाट्यरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
 
प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या अथक ५० वर्षांच्या स्वर्णिम कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली.
 
१४ मार्च १९३१साली मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात प्रभाकर पणशीकर यांचा जन्म झाला. पंतांचे वडील विष्णुशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृत प्रकांडपंडित होते.
 
लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च इ.स. १९५५ ह्या दिवशी ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो. ग. रांगणेकरांच्या ’नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ’कुलवधू’, ’भूमिकन्या सीता’, ’वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
 
तो मी नव्हेच
इ.स. १९६२ साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे ’तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा अत्र्यांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतानाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली. पंतानी ती अर्थातच मान्य केली आणि १५ ऑगस्ट १९६२ ला ’तो मी नव्हेच’चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका, काही क्षणांत भूमिकाबदलांसह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले. रसिकांचे पराकोटीचे प्रेम आणि कीर्ती पंतांना ’तो मी नव्हेच’ने मिळवून दिली.
 
नाट्यसंपदा
पुढे मो.ग.रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पंत ’नाट्यनिकेतन’मधून बाहेर पडले आणि ’अत्रे थिएटर्स’मधून ’तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करू लागले. आपले स्नेहीमोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने त्यांनी इ.स. १९६३ साली ’नाट्यसंपदा’ ह्या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखीत ’अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर ह्यांचे ’मोहिनी’ अशी दोन नाटके ’नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली. दुर्दैवाने ती फारशी चालली नाहीत.
 
मात्र त्यानंतरच्या ’मला काही सांगायचंय’ आणि विशेषत: ’इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकांच्या निर्मितीने ’नाट्यसंपदे’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ’कट्यार काळजात घुसली’ ह्या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. इ.स. १९७० मध्ये ’तो मी नव्हेच’चे हक्क ’नाट्यसंपदे’ने विकत घेऊन पुढे ह्या नाटकाचे पंतांनी २०००हून अधिक प्रयोग केले.
 
तो मी नव्हेच मधल्या पंचरंगी, बहुढंगी भुमिकांतून स्वतःचे नट म्हणून असलेले अस्तित्व हे तर पणशीकरांच्या अभिनयातला मोरपंखी तुराच जणू...  ते करताना ते भूमिका जगले.. व्यक्तिरेखेतल्या बारकाव्यांनी नाटकाला अजरामर केले...काळ बदलला...नटांमध्ये बदल झाले..तरीही पंतांचा तो लखोबा लोखंडेची किमयाच वेगळी.... खरेच ती सर कुणालाच आली नाही.
 
नाट्यसंपदेचे संस्थापक म्हणून पंतांची कामगीरी अजोड नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले जाईल. त्यांनी निर्मिती केलेल्य़ा नाटकांची यादी देण्यापेक्षा जी आज माझ्या स्मृतीत साठवली गेली आहेत...त्यांचा उल्लेख करतो.
 
वसंत कानेटकरांचे अश्रुंची झाली फुले मधला प्रिन्सीपॉल विद्यानंद... इथे ओशाळला मृत्यू मधला औरंगजेब... तो मी नव्हेच तर आहेच...थॅंक यू मि. ग्लॉड मधला इन्स्पेक्टर.... बेईमान मधली सतीश दुभाषींबरोबरची गीरणी मालकाची भूमिका....मला काही सांगायचं...आणि जिथे गवकाला भाले फुटतात मधील अभीनयाचे टोक..... सारेच.... पंतांच्या अभिनयातून साकरलेल्या भूमिकांनी मराठी रंगभूमीवर रसिकांना राजहंसी रुपाचे दर्शन घडले.. सामीजिक आशय..त्यातून समाजातली दरी.. इतिहासात डोकावता औरंगजेबालाही त्यांनी जिवंत केले...प्रिन्सीपॉल विद्यानंदाच्या रुपाने शैक्षणीक क्षेत्रातल्या प्रवृत्तींवर केलेली टिका...
 
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लखोबा लोखंडेच्या रूपांतून लग्नासाठी उतावीळ झालेल्या तरुणींची कथा सांगणारे आचार्य अत्रे यांचे तो मी नव्हेच ला दिलेले योगदान......सारेच पंतांच्या कर्तृत्वाची त्यांच्या अभिनय केलची उतुंग उंची घडवितात.
 
पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. वसंतरांव देशपांडे व  पं.जितेंद्र अभिषेकीं या त्रयींच्या रुपाने साकारलेले कट्यार काळजात घुसली हे नाटक तथाकथित संगीत नाटकांचा चेहराच बदलून टाकणारे नाटक देउन संगीत रसिकांना वेगळ्या विश्वात घेउन गेले. याची निर्मितीही पंतांच्या शिरपेचातला मानाचा तुराच.
१३ जानेवारी २०११ साली त्यांचे निधन झाले. लोकमत समूहातर्फे पंतांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
 
सौजन्य : मराठी विकिपिडीया आणि ग्लोबल मराठी संकेतस्थळ 
 

Web Title: Remembrance Day of senior actor Prabhakar Panashikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.