उथळ पुरस्कार सोहळे बंद केले पाहिजेत - नवाजुद्दीन सिद्दीकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 12:00 PM2017-03-03T12:00:35+5:302017-03-03T12:03:21+5:30
बॉलिवूडमधील उथळ पुरस्कार सोहळे बंद केले पाहिजेत, अशी टीका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने केली.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - ' ऑस्कर्समध्ये सोहळ्यात ओम पुरींना श्रद्धांजली वाहिली जाते मात्र बॉलिवूडलचा त्यांचा विसर पडला' अशा शब्दांत टीका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने केली होती. मात्र त्यापुढे जात आता नवाजुद्दीने बॉलिवूडमधील सोहळ्यांवरच टीकास्त्र सोडले असून ' असे उथळ पुरस्कार सोहळे बंदच केले पाहिजेत' असे वक्तव्य केले आहे. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने या विषयावर मत मांडले आहे.
' ओम पुरी यांच्या निधनानंतर (भारतात) जे सोहळे पार पडले, त्यापैकी एकाही सोहळ्यात ओम यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. असे किती सोहळे पार पडले हे मला नक्की माहीत नाही, पण (अशा घटनांमुळे) एक अभिनेता म्हणून तुम्हाला दु:ख होते. कारण ते (ओम पुरी) एक महान अभिनेते होते, त्यांनी फक्त भारतीय सिनेमात नव्हे तर जगभरातील सिनेमामध्ये अमूल्य योगदान दिले. त्यामुळे , त्यांच्या स्मरणार्थ कमीत कमी ' दोन शब्द' तरी बोलायला हवे होते' असे मत नवाजुद्दिनने व्यक्त केले.
एवढेच नव्हे तर नवाजुद्दिनने पुरस्कार सोहळ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ' जर (पुरस्कार सोहळे) हे कायम राहिले तर चांगल्या कलाकारांना /अभिनेत्यांना अशा सोहळ्यांना उपस्थित राहणे कठीम होईल, कारण त्यात काही गंभीरताच उरलेली नाही. ती जर असती तर त्यांनी ओमजींना श्रद्धांजली नक्कीच वाहिली असती. हे सोहळे अतिशय उथळ बनले असून मला कधीकधी असं वाटतं की ते (सोहळे) बंद झाले पाहिजेत' अशा उद्विग्न शब्दांत नवाजुद्दिनने त्याचा संताप व्यक्त केला.
बहुचर्चित 'ऑस्कर २०१७' सोहळ्यात ज्येष्ठ दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात सारा बरेइलिसकडून दिवंगत कलाकारांच्या स्मरणार्थ गीत सादर करण्यात आले त्यामध्ये ओम पुरी यांच्या नावाचाही समावेश होता. याच मुद्यावरून नवाजुद्दीनने ट्विटरवरून बॉलिवूडच्या सोहळ्यांवर टीकास्त्र सोडले होते. 'ऑस्कर सोहळ्यात दिवंगत अभिनेते ओम पुरींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळ्यात ओम पुरींच्या (चित्रपटसृष्टीतील) योगदानानाबद्दल कोणी अवाक्षरही काढले नाही. ही शरमेची बाब आहे' असे ट्विट करत त्याने केले होते.