गायक सोनू निगमने मुंडण करून दिले धमकीला सडेतोड उत्तर
By admin | Published: April 20, 2017 06:07 AM2017-04-20T06:07:21+5:302017-04-20T06:07:21+5:30
मशिदीवरील भोंग्यांवरून होणाऱ्या अजानबाबत वादग्रस्त टिष्ट्वट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने, एका मुस्लीम मित्राकडून मुंडण करून घेत
मुंबई: मशिदीवरील भोंग्यांवरून होणाऱ्या अजानबाबत वादग्रस्त टिष्ट्वट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने, एका मुस्लीम मित्राकडून मुंडण करून घेत, मुस्लीम नेत्याने दिलेल्या धमकीला सडेतोड उत्तर दिले आहे. माझ्या टिष्ट्वटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून, कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असेही त्याने स्पष्ट केले.
मशिदीवरील भोंग्याद्वारे होणाऱ्या अजानवर आक्षेप नोंदविणारे टिष्ट्वट सोनू निगमने १७ एप्रिल रोजी केले होते. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी तर निगमविरोधात इशारा देऊन, सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी पुण्यात सोनूविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यामुळे सोनू निगमला संरक्षण देण्यात आले. बुधवारी सोनू निगमने पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात मोहम्मद रफी यांना वडील मानले, ज्याच्या गुरूचे नाव उस्ताद गुलाम मुस्तफा खान आहे, तो मुस्लीमविरोधी कसा असू शकतो, असा सवाल त्याने केला.
प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. आपल्या भावनांचा व टिष्ट्वटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. अजानला नव्हे, तर मशिदीवर कर्कश्श आवाजात वाजणाऱ्या लाउडस्पीकरला माझा विरोध आहे, पण याचा चुकीचा अर्थ लावला. लोक धार्मिक उत्सवाच्या नावाखाली रस्त्यावर उतरतात. मिरवणुकीत गाणे मोठ्या आवाजात वाजवितात, मद्य सेवन करून जनतेला त्रास देतात, असेही सोनू म्हणाला.
नेमके काय
होते टिष्ट्वट?
‘मी मुस्लीम नाही, तरीही
रोज सकाळी अजानमुळे माझी झोपमोड का? ही बळजबरी कधी थांबणार?’ असा सवाल सोनू निगमने टिष्ट्वटरवर केला होता.
धमकीला उत्तर
सोनू निगमने आपला मित्र हकिम आलीम याच्याकडून आपले केस कापून घेत, मुस्लीम नेते सय्यद कादरी यांना जशास तसे उत्तर दिले. कादरी यांनी आता दहा लाख रुपये तयार ठेवावेत, असे आवाहनही केले. त्यावर कादरी यांनी उत्तर दिले असून, सोनू निगमला जुन्या चपलांचा हार घालून रस्त्यांवरून फिरविणाऱ्यांना दहा लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे.