... अन् गरिबांचा डॉक्टर आमदार झाला!
By admin | Published: October 26, 2014 12:20 AM2014-10-26T00:20:24+5:302014-10-26T00:20:24+5:30
घरी अठराविश्वे दारिद्र्य... वडील दारूच्या आहारी गेलेले... आई मजुरी करून घर सांभाळायची. अशा परिस्थितीत मोळ्या विकल्या, शेळया चारल्या, रेल्वे स्टेशनवर कुलीचे कामही केले.
डॉ़ मानेंची संघर्षकथा : मोळ्या, गोवऱ्या विकून घेतले शिक्षण
नागपूर : घरी अठराविश्वे दारिद्र्य... वडील दारूच्या आहारी गेलेले... आई मजुरी करून घर सांभाळायची. अशा परिस्थितीत मोळ्या विकल्या, शेळया चारल्या, रेल्वे स्टेशनवर कुलीचे कामही केले. असे काबाडकष्ट करून तो शिकला. एमबीबीएस, एमडी झाला आणि गरीब लोकांची सेवा करीत आज आमदारही झाले. गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्या नवनिर्वाचित आमदाराचे नाव आहे डॉ. मिलिंद माने.
उत्तर नागपूर मतदारसंघातून नवनिर्वाचित भाजपचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी शनिवारी लोकमतला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमतच्या संपादकीय मंडळींसोबत चर्चा करताना त्यांनी आयुष्यात भोगलेल्या यातना, सहन केलेली उपेक्षा, जीव मेटाकुटीला येईपर्यंत केलेला संघर्ष आणि उपसलेल्या काबाडकष्टांची संघर्षकथा सांगितली, तेव्हा आजवर न ऐकलेली एका डॉक्टरच्या आयुष्यातील ही अप्रकाशित कथा पहिल्यांदाच जगासमोर आली. त्यांची ही संघर्षकथा ऐकताना लोकमतच्या संपादकीय विभागातील सदस्यांचेही डोळे पाणावले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची साथसोबत असल्यामुळेच आपण हे सर्व करू शकलो, असे डॉ़ माने ठामपणे सांगतात.
डॉ. मिलिंद माने यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील पारस या गावी झाला. वडील रेल्वेमध्ये गेटमॅन होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने आईला मजुरी करावी लागत होती. मोळ्या, गोवऱ्या आणि बकरीचा चारा विकून त्या घराचा गाडा चालवित होत्या. मिलिंद हे लहानपणापासून हुशार होते. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडचण येत होती परंतु ते खचले नाहीत. घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी स्वत: काम करण्याचा निर्णय घेतला. ते अकोल्याला गेले. रेल्वे स्टेशन ते बस स्टॅण्डपर्यंतच्या रस्त्यांवर कामे शोधली. परंतु कुणीही काम द्यायला तयार नव्हते. जवळ पैसे नाही, त्यामुळे त्यांना काही दिवस भीकही मागावी लागली. ते गावाकडे परतले. गावातच मोळ्या विकू लागले. जंगलातून बकऱ्यांचा चारा आणून तो विकणे, कोळसा विकणे, आंबा, डबलरोटी विकणे, इतरांच्या शेतात नांगरणे, वखरणे आदी शेतीची पूर्ण कामे केली. राब-राब राबले. या पैशातून ते स्वत:साठी कपडे, पुस्तके घेत आणि काही पैसे घरच्या खर्चासाठी आईकडे देत. असे करून १२ वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पारसमध्येच पूर्ण केले. शिक्षणात हुशार असल्याने त्यांना बारावीमध्ये चांगले गुण मिळाले. त्यांनी नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्रवेशासाठी अर्ज केला. त्यांचा नंबर लागेलच, अशी त्यांना खात्री नव्हती. त्यामुळे अकोला येथे बीएस्सीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. रेल्वेमध्ये कुलीचे काम करीत असताना काही कुलींच्या हातचा त्यांना मारही खावा लागला. त्यानंतर ते रेल्वे रुळावर अंगावरची कामे करू लागले. नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचा ‘एमबीबीएस’साठी नंबर लागला. तेव्हा ते रुळावरचे ओझे उचलत होते. घरी तार आली. तार पाहून घरातील सर्व लोक घाबरले. त्यांची बहीण ती तार घेऊन थेट मिलिंद यांच्याकडे धावत आली. त्यावेळी बापट नावाचे रेल्वेत एक अधिकारी होते. त्यांनी ती तार वाचली आणि त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान शासकीय दंत महाविद्यालयातही त्यांचा नंबर लागला होता. सहा महिने त्यांनी कॉलेजही केले, परंतु एमबीबीएसमध्ये नंबर लागल्याने ते सोडले.
वैद्यकीय सेवा गरिबांसाठीच
मिलिंद माने यांनी मेयोमधून एमबीबीएस, एमडी पूर्ण केले. इंदोरा चौकात त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. परंतु त्यांचा डॉक्टरीपेशा हा कधीच पैसे कमावण्यासाठी नव्हता़ इंदोरा चौकातील त्यांचे सरस्वती रुग्णालय म्हणजे गरिबांचे हक्काचे रुग्णालय होय. पैसे असो किंवा नसो रुग्णावर हमखास उपचार होणार, याची शाश्वती म्हणजे डॉ. माने यांचे रुग्णालय़ रुग्णांच्या या विश्वासावरच त्यांनी समाजकारण केले.
कपडे बघून वर्गमित्रांनी घेतले रॅगिंग
एमबीबीएससाठी मिलिंद माने पहिल्यांदा नागपुरात आले, तेव्हा त्यांचे राहणीमान हे साहजिकच खेडेगावातील मुलासारखे होते. सदरा, पायजामा, हातात थैली. त्यांचा हा अवतार पाहून मेयोतील त्यांच्या वर्गमित्रांनीच त्यांचे रँगिग घेतल्याचे त्यांनी या मुलाखतीत आवर्जून सांगितले़
आर्थिक परिस्थितीमुळे परतावे लागले घरी
वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांना वारंवार पैसे लागायचे. घरची परिस्थिती पैसे पाठविण्यासारखी नव्हतीच. तेसुद्धा स्वत: काम करून आपलाच उदरनिर्वाह कसाबसा चालवायचे. तेव्हा एमबीबीएसमध्ये सुरुवातीला स्कॉलरशिपही मिळत नव्हती. या सर्व अडचणींमुळे ते घरी परतले आणि पुन्हा काम शोधू लागले. शेतात काम करू लागले.
प्रचारातही तपासायचे रुग्ण
डॉ. माने यांच्यावर रुग्णांचा मोठा विश्वास. त्यामुळे प्रचारादरम्यानसुद्धा त्यांना शोधत अनेक रुग्ण उपचारासाठी यायचे. कुठे सभा असो की, कुठे पदयात्रा त्या ठिकाणी रुग्णाचे नातेवाईक रुग्णासह पोहोचायचे. अशा वेळी सभा किंवा पदयात्रा अर्धवट सोडून डॉ. माने त्या रुग्णाला तपासायचे. वैद्यकीय सेवेतील त्यांच्या या समर्पणाच्या भावनेमुळेच ते आमदार म्हणून निवडून आले.
घर आणि रुग्णालयही भाड्याचेच
डॉ. मिलिंद माने हे मागील २५ वर्षांपासून प्रॅक्टिस करीत आहेत. शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक डॉक्टरांचे स्वत:चे बंगले व रुग्णालय उभारून होतात. परंतु डॉ. माने आजही भाड्याच्या घरातच राहतात. त्यांचे रुग्णालयसुद्धा भाड्याच्याच घरात आहे. नुकताच त्यांनी एक प्लॉट घेतला आहे, परंतु त्यावर अजूनही घर बांधलेले नाही. अशा परिस्थितीतही केवळ डॉ. माने यांचा जनसंपर्क आणि प्रामाणिकपणा पाहूनच भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाने त्यांना उत्तर नागपूरमधून पक्षाची उमेदवारी दिली. त्यांना आमदारकीची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा त्यांच्याकडे हजार रुपयेसुद्धा नव्हते, हे विशेष़
स्टेथॅस्कोप अन् बी.पी. आॅपरेटर सोबतच राहणार
डॉ. मिलिंद माने हे आमदार झाल्याने त्यांना चाहत्यांना प्रचंड आनंद झाला, परंतु सोबतच त्यांना एक चिंता सुद्धा लागली आहे. ती म्हणजे डॉ. माने हे आता प्रॅक्टिस करणार की नाही? याबाबत स्वत: डॉ. माने यांना छेडले असता ते म्हणाले ‘लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेचे प्रश्न सोडविणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे रुग्णालयात ओपीडीसाठी फारसा वेळ मिळणार नाही, ही बाब खरी आहे. परंतु रुग्णसेवेमुळेच जनतेशी व चळवळीशी माझे नाते निर्माण झाले.
ते नाते मी कसे तोडू? हे नाते मला जगण्याचे बळ देते. हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी राजकारणातील कुठल्याही शिखरावर पोहोचलो तरी ही रुग्णसेवा कायम राहणार. मी कुठेही गेलो तरी माझ्या बॅगेत स्टेथॅस्कोप आणि बी.पी. आॅपरेटर असेलच़ नागपुरातही प्रॅक्टिस सुरू राहील. केवळ वेळांमध्ये बदल केला जाईल, असेही डॉ़ माने यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)