देसी गर्ल करणार हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती
By Admin | Published: July 12, 2017 01:07 PM2017-07-12T13:07:56+5:302017-07-12T14:10:03+5:30
प्रियंका हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे समोर आले आहे. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली.
मुंबई, दि. 12 - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रानं भारतातील प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये तिला यशही मिळाले आहे. आता प्रियंका हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे समोर आले आहे. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. प्रियांकाने व्हेंटिलेटर या चित्रपटातून मराठी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले होतं. तिच्या निर्मिती अंतर्गत बनलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
प्रियांका चोप्राने क्वांटिको या मालिकेतून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने बेवॉच या सिनेमातूनही तिच्या अभिनयाची छाप सोडली. आता ती सिनेमा निर्मिती करणार आहे. तिनं प्रादेशिक भाषांमधील सिनेमांची निर्मिती केली. ज्यामध्ये तिला चांगलं यशही मिळालं. सध्या ती हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार करत आहे, असं मधू चोप्रा यांनी सांगितलं. हॉलिवूड चित्रपटाचे कथानक सध्या तिच्याकडे आहे. सध्या त्याच्यावर काम सुरु आहे. या चित्रपटाचे कथानक महिला सक्षमीकरण किंवा वंशद्वेशावर आधारित असेल. असे मधू चोप्रा यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ज्यांना कुणाचा आधार नाही, अशांना अधिकार मिळवून द्यायचे असं, प्रियांकाने सिनेमा निर्मितीत पाऊल ठेवतानाच ठरवलं होतं. यावर्षी आमचे तीन प्रादेशिक भाषांमधले सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. आता प्रियांकाची बॉलिवूड सिनेमाची निर्मिती करण्याचीही इच्छा आहे. हॉलिवूड सिनेमाची निर्मिती प्रक्रिया या वर्षाअखेरपर्यंत सुरु होईल. प्रियांकाला व्यवसायायिक ज्ञानही उत्तम आहे. चांगली स्टोरी आणि बजेटही आवाक्यातलं असायला हवं. प्रियांका कोणताही निर्णय योग्यच घेईल, असा विश्वास असल्याचं मधू चोप्रा यांनी सांगितलं.
पुढच्या महिन्यात प्रियंका चोप्राच्या बॅनरखाली तयार झालेला दुसरा मराठी चित्रपट काय रे रास्कला रिलीज होणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. आय गिरीधरण स्वामी यांचे दिग्दर्शन असलेला "काय रे रास्कला" या चित्रपटाद्वारे गौरव घाटणेकर आणि भाग्यश्री मोटे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्याशिनाय निखिल रत्नपारखी, सुप्रिया पाठारे आणि अक्षय कोठारी यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असतील. "व्हेंटलिलेटर" सारख्या भावनाप्रधान चित्रपटानंतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न प्रियांकाची कंपनी करणार आहे.