‘संशयकल्लोळ’ची शताब्दी

By admin | Published: March 19, 2016 02:36 PM2016-03-19T14:36:36+5:302016-03-19T14:36:36+5:30

‘फाल्गुनराव’ खरंतर मूळचा विलायती, पण त्याला आपली भाषा शिकवून, आपले कपडे चढवून देवलांनी 1893 साली रंगभूमीवर आणलं. पण प्रयोगाच्या पातळीवर ते फसलं. 23 वर्षानी याच नाटकाला त्यांनी संगीताचा साज चढवला आणि त्यानं इतिहास घडवला!

Centenary of the 'sahajyalol' | ‘संशयकल्लोळ’ची शताब्दी

‘संशयकल्लोळ’ची शताब्दी

Next
गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकानं मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. 
या नाटकाचं हे शताब्दी वर्ष. त्यानिमित्त..
 
- डॉ़ अजय वैद्य
 
'संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाच्या निर्मितीची कहाणी विलक्षण आहे.
देवलांनी 1893 साली, म्हणजे ‘सं. संशयकल्लोळ’ नाटकाच्या अगोदर 23 वर्षे, ‘फाल्गुनराव’ या नावाचे एक गद्य नाटक लिहिले होते. या नाटकाला देवलांनी एक छोटीशी प्रस्तावना लिहिली होती, ती अशी : ‘फाल्गुनराव हा मूळचा विलायती; पण त्याला इकडची भाषा शिकवून, त्याच्या अंगावर इकडील कपडे चढवून व इकडील चालीरितींची त्यास चांगली माहिती करवून, लोकसेवेस सादर के ला आहे. फाल्गुनराव मोठा गमती आहे. त्याच्या भाषणाने हसू यावयाचे नाही, असा मनुष्य विरळाच सापडेल. कित्येक अत्यंत नीतिभक्त त्यास अभद्र बोलणारा, असे कदाचित म्हणतील; पण वास्तविक तो तसा नाही हे अनुभवान्ती रसिक व मर्मज्ञ लोकांस कळून येईल.’
मोलिएर (1622-1673) या विख्यात फ्रेंच नाटककाराचे ‘गानारेल’ या नावाचे एक विनोदी नाटक आहे. या नाटकाच्या आधाराने आर्थर मर्फी या इंग्लिश नाटककाराने ‘ऑल इन दि रॉँग’ हे नाटक लिहिले. मर्फीचे हे नाटक 1786 मध्ये प्रसिद्ध झाले. ड्रअरी लेनमधील थिएटर रॉयल नावाच्या नाटय़गृहात त्याचा प्रयोग झाला. मोलिएरच्या नाटकातला गानारेल हा मर्फीच्या नाटकात सर जॉन रेस्टलेस झाला आणि देवलांच्या नाटकात फाल्गुनराव म्हणून अवतरला. मोलिएरचा लेली म्हणजे मर्फीचा बेव्हर्ली आणि देवलांचा आश्विनशेट. मोलिएरची सेली म्हणजे मर्फीची बेलिन्दा आणि देवलांची रेवती, तर मर्फीची लेडी रेस्टलेस म्हणजे देवलांची कृत्तिका. मर्फीच्या नाटकातील ज्या घटना केवळ पाश्चात्त्य वातावरणाशी सुसंगत होत्या. त्या देवलांनी मोठय़ा कौशल्याने बदलल्या आणि प्रत्येक गोष्ट आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतली. मूळच्या विलायती गानारेलवर देवलांनी फक्त इकडचे कपडेच चढवले नाहीत तर त्यांनी त्याला इकडच्या चालीरितींचीही चांगलीच माहिती करून दिलेली दिसते. या नाटकाला परकीय नाटकाचा मोठा आधार आहे याचा चुकू नदेखील संशय येणार नाही व ते स्वतंत्र नाटक आहे असेच वाटेल, इतके हुबेहुब व चपखल रूपांतर करण्यात देवल यशस्वी झाले आहेत. गेल्या दीडशे वर्षामध्ये पाश्चात्त्य नाटकांची जी रूपांतरे मराठीत झाली त्यात मानाचे पहिले स्थान देवलांच्या ‘संशयकल्लोळ’ या नाटकाला द्यावे लागेल, अशी रूपांतराच्या कलेची किमया देवलांनी दाखविली आहे. 
‘फाल्गुनराव’ हे गद्य नाटक शाहूनगरवासी नाटक मंडळी, सामाजिक नाटक मंडळी आणि महाराष्ट्र नाटक मंडळी या तीन प्रमुख नाटक मंडळांनी रंगभूमीवर आणले होते. नाटकाचा नायक आश्विनशेट आहे, या चुकीच्या झालेल्या कल्पनेमुळे नटश्रेष्ठ गणपतराव जोशी हे शाहूनगरवासी मंडळीच्या नाटकात ती भूमिका करीत. त्यामुळे फालगुनरावाची भूमिका एका दुय्यम नटाकडे गेली आणि त्याने या भूमिकेचे मर्म न कळल्यामुळे एक विदूषक उभा केला. सामाजिक नाटक मंडळीच्या प्रयोगात फाल्गुनरावाची भूमिका नटवर्य रामभाऊ गोखले, तर महाराष्ट्र नाटक मंडळीत नटवर्य गणपतराव ती भूमिका करीत; पण त्या दोघांच्याही भूमिका उठावदार होत नसत. म्हणून काही अवघ्याच प्रयोगांनंतर हे नाटक बंद पडले. ते जवळजवळ सोळा वर्षे प्रयोगविरहित राहिले. गंधर्व नाटक मंडळीला त्यावेळी एका नवीन नाटकाची जरुरी होती. देवल याच नाटक मंडळीत अभिनय शिक्षक म्हणून काम करत होते. गंधर्व नाटक मंडळीचे एक प्रमुख भागीदार, प्रमुख नट व देवलांचे पट्टशिष्य नटवर्य गणपतराव बोडस यांनी देवलांकडे नवीन नाटकाची मागणी केली. देवलांची प्रकृती त्यावेळी ठीक नसल्यामुळे ते नवीन नाटक लिहिण्याच्या मन:स्थितीत नव्हते. म्हणून त्यांनी पूर्वी लिहिलेल्या गद्य ‘फाल्गुनराव’ नाटकाचे संगीतीकरण करावे, असे बोडसांनी त्यांना सुचविले. त्याचबरोबर रंगतीच्या दृष्टीने काही फेरफारही बोडसांनी सुचविले. गद्य ‘फाल्गुनराव’ नाटकात कृत्तिका ही फाल्गुनरावाची पहिली बायको असे आहे. नवरा व बायको एकमेकांविषयी संशयी असतील तर त्यांच्या वयात भरपूर अंतर असले पाहिजे, म्हणून फाल्गुनराव हा कृत्तिकेचा बिजवर दाखवावा, अशी सूचना बोडसांनी केली. ‘संशयकल्लोळ’ या नवीन नावाने या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. या नाटकातील पात्रंचे पोषाख ठरविणो आणि त्याचे दिग्दर्शन बोडसांनीच करावे, असे देवलांचे मत होते. देवलांनी केलेला म्हणींचा उपयोग हे या नाटकाचे आणखी एक वैशिष्टय़. प्रसंगाला अनुरूप अशी त्यांनी वापरलेली परिणामकारक ठसकेबाज एक एक म्हण दहा ओळींच्या मजकुराला भारी आहे. 
ठमाबाईचे झाले बारा राम आणि घरी नवरोजींनी साधलं काम, घरचीचं ते मिठवणी आणि बाहेरचीचं मिठ्ठापाणी, घाईत घाई आणि विंचू डसला गं बाई, चुलीपुढे शिपाई आणि दारापुढे भागूबाई, नागीण पोसली आणि पोसणा:याला डसली, कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही, आपण शेण खायचं आणि दुस:याचं तोंड हुंगायचं, कोण चाललं पुढं तर कितक्याचं घोडं?. म्हणींचा असा परिणामकारक उपयोग दुस:या कुठल्याही मराठी नाटकात आजवर दिसलेला नाही. 
गद्यात गटांगळ्या खाऊन पद्यात आणल्यामुळे लोकप्रिय झालेले हे नाटक आजपावेतो तसेच ताजेतवाने आहे. जोर्पयत पती-पत्नी हे नाते शिल्लक राहील, तोर्पयत त्यांच्यातील संशयाचा कल्लोळसुद्धा त्यांच्या जीवनात सावलीसारखा राहील.
 
‘संशयकल्लोळा’त हास्यरस हा प्रमुख रस असून, त्याला शृंगाराची जोड मिळाली आहे हे लक्षात घेऊन आणि रागबद्ध संगीत हास्यरसाचा उत्क र्ष साधू शकत नाही याची जाणीव ठेवून देवलांनी या नाटकासाठी फक्त एकोणतीस पदे लिहिली. यातील बावीस पदे ही रेवती आणि आश्विनशेट यांच्या शृंगारानुकूल प्रवेशासाठी आहेत. ‘संशयकल्लोळा’तील संगीतामुळे फाल्गुनरावाची मोहकता वृद्धिंगत झाली. जी मूळची गद्य नाटके संगीताचा पेहराव धारण करून मराठी रंगभूमीवर आली त्यापैकी ‘फाल्गुनराव’ हे पहिले नाटक आहे. 
या नाटकांची रंगीत तालीमही देवलांना बघता आली नाही. अथपासून इतिर्पयत हास्यरसाने ओथंबलेल्या आणि मानवी स्वभावाच्या सूक्ष्म संशयी दाखविणा:या या प्रभावी नाटकाचा पहिला प्रयोग पाहायला खुद्द देवल मात्र हयात नव्हते. 14 जून 1916 ला या थोर नाटककाराचा मृत्यू झाला आणि 2क् ऑक्टोबर 1916 ला ‘संगीत संशयकल्लोळ’चा पहिला प्रयोग झाला. 
 
(लेखक गोव्यातील ज्येष्ठ नाटय़ अभिनेते आहेत)
amvaidya@bsnl.in

 

Web Title: Centenary of the 'sahajyalol'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.