मानसिक आरोग्याकडे पाहताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 02:52 AM2016-01-10T02:52:23+5:302016-01-10T02:52:23+5:30

बहुतांशी एखाद्या व्यक्तीला स्वत:बद्दल आत्मविश्वास असतो, आदर असतो आणि स्वत:च्या अस्तित्वाबद्दलही एक प्रकारचे सशक्त प्रेम असते. तेव्हाच त्या व्यक्तीला आपण सक्षम म्हणू शकतो.

Looking at mental health ... | मानसिक आरोग्याकडे पाहताना...

मानसिक आरोग्याकडे पाहताना...

Next

- डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर (लेखिका ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

बहुतांशी एखाद्या व्यक्तीला स्वत:बद्दल आत्मविश्वास असतो, आदर असतो आणि स्वत:च्या अस्तित्वाबद्दलही एक प्रकारचे सशक्त प्रेम असते. तेव्हाच त्या व्यक्तीला आपण सक्षम म्हणू शकतो. मानसिक आरोग्याची संकल्पना ही माणसाच्या अस्तित्वाइतकीच पुरातन आहे. आपली मानसिक आरोग्याबद्दलची जागृती, रोगाबद्दलची माहिती आपल्या पुरातन ग्रंथांमध्येही आढळते. चरकसंहिता, सुश्रुत यांसारख्या आयुर्वेदिक ग्रंथांतही मानसिक आरोग्याची संकल्पना वर्णन केलेली आहे. मुळात मानसिक आरोग्य वा रोगाबद्दल पाश्चात्त्य संकल्पना व आशियाई संकल्पना या विविध पद्धतीने जोपासल्या आहेत. अथर्व वेदात मानसिक रोगाची व त्यावरील उपचारांची माहिती सखोल रूपातही दिलेली आहे. अथर्व वेदात सांगितल्याप्रमाणे मानसिक व्यक्तीत्व हे सत्त्व, रज व तम या तीन गुणांत जोपासलेले आहे.
एकंदरीत फ्रॉईडसारखे मानसशास्त्रज्ञ मनाची गुंतागुंत व कार्यक्षमता या सुप्त मनातील कार्यपद्धतीवरून वर्णन करतात. सुप्त मनातून येणाऱ्या जाणिवा, दबलेल्या इच्छा व त्यामुळे व्यक्त होणारे विशिष्ट आचारविचार याचा ऊहापोह मनोविश्लेषणातून बऱ्याच वेळा केला जातो. स्वप्नातील अनेक रेखाटनांमुळे मनात काय चालले आहे किंवा मनात कुठल्या क्लिष्टता आहेत, याचे विश्लेषण केले जाते. मुळात मन कुठे आहे, हे सांगतानाच सामान्य माणसांचा गोंधळ उडतो. खरं ज्याला आपण ‘मनातून’ म्हणतो, त्या ‘दिल से’ किंवा ‘हृदयातून’ येतात असे समजले जाते, पण मानसिक आरोग्याविना खरे आरोग्य नाही हे खरे. मानसिक आरोग्य हे आपल्या मानसिक प्रगल्भतेचे प्रतीक आहे. आपल्या वैयक्तिक व सामाजिक सक्षमतेतून जास्तीतजास्त समाधान कसे मिळेल, स्वस्थचित्त व स्थिर चित्त-मन कसे लाभेल, याचा विचार प्रत्येक जण कधी ना कधी आणि विशेषत: भावनांचा उद्रेक झाल्यावर करीत असतो.
आजच्या आधुनिक युगात आपण पाहतो की, आपली आरोग्याची शारीरिक व मानसिक दोन्हीची घडी विस्कटली आहे. ऐहिक आकांक्षा व मानसिक शांतीचे गणित अजिबात जुळत नाही. मानसिक आरोग्याची कल्पना तशी पाहिली तर तुलनात्मक आहे. अमुक एखादी गोष्ट मिळाली, म्हणजे व्यक्ती सुखी झाली असे म्हणता येणार नाही, तसेच संकटाचा पहाड कोसळला, म्हणून सगळ्याच व्यक्ती आयुष्यभर दु:खाच्या गुहेत लुप्तही होत नाहीत. किंबहुना, कितीही कठीण परिस्थितीत मन शांत ठेवून यशाची शिखरे गाठणारी माणसे या जगात आहेतच. तर अत्यंत पोषक परिस्थिती आहे, कुठलीही कठीण समस्या नाही, तरी रसातळाला जाणारी माणसेही याच पृथ्वीतलावर आहेत. याचाच अर्थ असा की, मनाची लीला अगाध आहे. मनाचे खेळ कल्पनांच्या पलीकडचे आहेत. आपण द्वेषाच्या भोवऱ्यात का अडकतो, आंधळ्या प्रेमात घरदार का सोडतो, कळत असतानासुद्धा चुकीचे निर्णय का घेतो, भावनांचा कल्लोळ आपल्या मनात कसा उठतो, अनेक चांगल्या गोष्टींचे महत्त्व आपल्याला का पटत नाही? आयुष्य एकच आहे हे आपल्याला माहिती आहे. ते संपूर्ण जगले पाहिजे व तेही आनंदाने जगले पाहिजे हेही बुद्धीला पटते, पण आपण तरीही दु:खी-कष्टी होत राहतो. आयुष्यातील आनंद किंवा स्वास्थ्य हे माणसाच्या एककल्ली अस्तित्वावर अवलंबून नसते. तो कितीही यशस्वी असला किंवा त्याच्याकडे कितीही संपत्ती असली, तरी त्याला एकट्याला जगणे कठीण असते. म्हणजेच त्याने जगाशी प्रगल्भ तडजोड केली आहे आणि ती कशी केली आहे, हे महत्त्वाचे आहे. अशा प्रगल्भ तडजोडी करणाऱ्या व्यक्ती पहिल्यांदा आपल्या मनाशी प्रामाणिक असतात. त्यांना आपणास काय हवे आणि काय नको, हे काही अंशी तरी कळलेले असते. त्याच वेळी या व्यक्तींची सामाजिक पराणुभूती त्यांना समाजाप्रति संवेदनशील बनविते. व्यक्तीच्या विचारभावना व त्या अनुषंगाने त्यांची इतरांशी वागायची पद्धत, व्यावहारिक दृष्टिकोन या गोष्टी शास्त्रीय पार्श्वभूमीवर आधारित आहेत आणि तरीही त्या मोजतामापता येत नाहीत. कारण त्या खळखळणाऱ्या आहेत.
समुद्राच्या प्रत्येक लाटेची उंची वेगळी असते, तसेच जगातील प्रत्येक व्यक्तीची एक स्वत:ची अशी ओळख असते. म्हणूनच ‘मैं ऐसा क्यू हंू?’ हा प्रश्न आपल्याला वेळोवेळी पडतो. इतर जण ज्या गंभीर गोष्टी सहज झेलतात, ते आपल्याला का पेलत नाही, असे जटिल प्रश्न मानसशास्त्राने खूप वेळा चर्चिले आहेत, पण त्याचे अमुक उत्तर मिळालेले नाही आणि मिळणारही नाही.

 

Web Title: Looking at mental health ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.