छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण नीती

By admin | Published: February 19, 2016 03:02 AM2016-02-19T03:02:03+5:302016-02-19T03:02:03+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले,

Environmental Policy of Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण नीती

छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण नीती

Next

दिनेश कचकुरे(इतिहास संशोधक)

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, जलव्यवस्थापन, वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता येते.
शिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांवर तसेच कोकण किनारपट्टीवर अभेद्य असे दुर्ग निर्माण केले व जलदुर्ग बांधताना पर्यावरणाचा सखोल अभ्यास केलेला दिसतो. सिंधुदुर्ग या जलदुर्गाचे बांधकाम पाहिल्यावर शिवराय हे श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ होते हे सिद्ध होते. १६६४ मध्ये कुरटे बेटावर शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधून घेतला. तेथील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक असल्याने बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील असे. पर्यावरणाच्या ज्ञानामुळे शिवरायांनी येथेच गड बांधला. या गडावर चोहोबाजूंनी खारे पाणी असताना तेथील दही बाव, साखर बाव व दूध बाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यावरणपूरक शौचालय बांधण्याचा आग्रह आज सरकार करते आहे, तसे ४० शौचकूप या जलदुर्गावर बांधलेले आहेत.
कोकणातील विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथेही शिवरायांनी दुर्गविज्ञान वापरले. गडाच्या पश्चिमोत्तर बाजूच्या समुद्राच्या तळात अंदाजे ४०० मीटर लांबीची तटबंदी मरीन आर्किआॅलॉजी क्लबने शोधून काढली आहे. या तटबंदीचा वापर गडाच्या संरक्षणासाठी केला गेला. शिवकाळात अनेक जहाजे या बाजूने येताना रसातळाला गेल्याची नोंद इतिहासात आहे. ही जहाजे कशास धडकून फुटतात याचे त्याकाळी पोर्तुगीज व इंग्रजांना कोडे पडत असे.
‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र’ या तत्त्वाप्रमाणे शिवरायांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नागिरी येथील बंदरात जहाज बांधणीचे कारखाने व गोदामे उभारली. सागरीमार्गे शत्रूच्या घुसखोरीस प्रतिबंध करून किनारपट्टीवरील जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाचे, भूगोलाचे परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय हे सर्व करणे शक्य नव्हते.
मराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांची तुलना केसाच्या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.’ या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा शिवरायांनी आपल्या पर्यावरण नीतीत योग्य वापर करून घेतला.
आदिलशहा सरदार अफजलखान याचा १० नोव्हें. १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात केलेला पराभव, तसेच २ फेब्रु. १६६१ रोजी मुघल अधिकारी कारतलब खान याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला पराभव ही गनिमी कावा युद्धतंत्राची उदाहरणे म्हणून सांगता येतात. शिवकाळात दगडधोंड्याचा वापर करूनही शत्रूला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात असे.
आजच्या सारखीच दुष्काळी परिस्थिती शिवकाळातही होती. १६३० तसेच १६५० या वर्षी दुष्काळ पडल्याची नोंद आढळते. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्फत आज्ञापत्रात शिवराय आज्ञा करतात की, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.’ पाणी बचतीचाही संदेश शिवराय देतात.
शिवरायांनी वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले होते. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली जात होती. रायगडाच्या पायथ्याला शिवरायांची मोठी आमराई असल्याचा उल्लेख मिळतो. त्यांनी आपल्या एका आज्ञापत्रात वृक्षतोड थांबविण्याचा संदेश देऊन संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या वचनाचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्याचे आढळÞून येते.
आजच्या काळात शिवकालीन पर्यावरण नीतीचे अनुकरण केले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना खऱ्या अर्थाने ते अभिवादन ठरेल.

Web Title: Environmental Policy of Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.