ट्रम्पशाहीची भयकारी वाटचाल

By admin | Published: January 29, 2017 11:16 PM2017-01-29T23:16:54+5:302017-01-29T23:16:54+5:30

अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात अमेरिकेसह साऱ्या जगाला दिलेल्या आपल्या धमक्या खऱ्या करण्याच्या उद्योगाला डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या पंधरवड्यातच सुरुवात केली आहे.

Dangerous way of trumpasha | ट्रम्पशाहीची भयकारी वाटचाल

ट्रम्पशाहीची भयकारी वाटचाल

Next

अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात अमेरिकेसह साऱ्या जगाला दिलेल्या आपल्या धमक्या खऱ्या करण्याच्या उद्योगाला डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या पंधरवड्यातच सुरुवात केली आहे. दि. २० जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी पूर्वाध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेतील गरीब व सामान्य वर्गातील जनतेसाठी सुरू केलेली आरोग्यविषयक साहायतेची योजना मोडीत काढण्याचा आदेश काढला. असा आदेश आपण तत्काळ काढू असे त्यांनी निवडणुकीच्या प्रचारकाळात जाहीरही केले होते. या आदेशामुळे त्या सेवेपासून वंचित होणाऱ्या लक्षावधी गरजूंविषयीची फारशी तमा त्यांनी बाळगली नाही.

त्यांची दुसरी धमकी अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांच्या दरम्यान हजारो मैल लांबीची एक किल्लेवजा व अनुल्लंघ्य भिंत बांधून अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या मेक्सिकनांना पायबंद घालण्याची होती. ती भिंत बांधायला लागणारा अब्जावधी डॉलर्सचा खर्च आपण मेक्सिकन सरकारकडून वसूल करू असेही ते म्हणाले होते. त्याविषयी बोलणी करण्यासाठी अमेरिकेत येऊ घातलेल्या मेक्सिकोच्या अध्यक्षांनी त्यांचा वॉशिंग्टन दौरा आता रद्द केला आहे. अशी भिंत बांधायला वा तिची किंमत मोजायला आमचा देश तयार नाही हे मात्र त्यांनी त्याचवेळी व त्याआधीही अनेकवार जाहीर केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर मेक्सिकोला दिलेल्या प्रतिधमकीचा उच्चार आता केला आहे.

‘तुम्ही भिंतीच्या खर्चाचा भार उचलणार नसाल तर तुमच्या देशातून अमेरिकेत येणाऱ्या सर्व मालावर बंदी घालू वा त्यावर २० टक्क्यांहून अधिक आयात कर लावू’ असे ते म्हणाले आहेत. मेक्सिकोची ५८ टक्क्यांएवढी अर्थव्यवस्था अमेरिकेशी असलेल्या व्यापारसंबंधांवर आधारली असल्याने ट्रम्प यांची धमकी त्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करणारी ठरणार आहे. या स्थितीत मेक्सिकोला अन्यत्र मित्र शोधावे लागतील वा ट्रम्प यांच्या आदेशानुसार मेक्सिकोतून अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणाऱ्यांवर कठोर बंधने घालावी लागतील. ट्रम्प यांचा स्वभाव पाहता ते भिंतीवाचून बाकीचे काही मान्य करतील असे जाणकारांना वाटत नाही. आपण सत्तेवर आलो तर अमेरिकेतील मुसलमानांच्या प्रवेशावर कठोर बंधने घालू अशी ट्रम्प यांची तिसरी धमकी होती. काल त्यांनी इराण, इराक, येमेन, सिरिया, सुदान, लिबिया आणि सोमालिया या देशांतील नागरिकांवर अमेरिकेतील प्रवेशबंदीचा ३० दिवसांचा आदेश लागू केला आहे. त्याचवेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबियाच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश देताना त्यांची कठोर तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यांचे हे कृत्य जगाच्या धार्मिक विभाजनाला बळकटी देणारे असून साऱ्या अमेरिकेत त्यांचा त्यासाठी निषेध होत आहे.

हिलरी क्लिंटन यांनीही त्यासाठी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. अमेरिकेच्या एका सांघिक न्यायालयाने अध्यक्षांच्या या आदेशावर मर्यादित स्टे दिला आहे. मात्र ट्रम्प यांच्यावर त्याचा कोणताही परिणाम नाही व तो होण्याची शक्यताही फारशी नाही. ते एक अहंमन्य वृत्तीचे नेते आहेत आणि जगातील सर्वाधिक शक्तिशाली पदावर ते आरूढ झाले आहेत. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या संरक्षण विभागाला भेट देऊन देशाचे शस्त्रबळ अनेक पटींनी वाढवून देण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला आहे. अमेरिकेच्या या ‘आत्मरक्षक’ व जगाच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याच्या धोरणाची ही आरंभीची पावले आहेत आणि जगाच्या राजकारणात त्यामुळे आमूलाग्र बदल घडून येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे सैन्य ज्या पाश्चात्त्य लोकशाही देशात तैनात आहे त्याचा खर्च त्या देशांनी करावा असेही ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

जर्मनी, रशिया, कॅनडा, मेक्सिको आणि जपान या पाच प्रगत देशांच्या प्रमुखांशी एकाच दिवशी एकेका तासाच्या अंतराने ट्रम्प यांनी परवा फोनवर बोलणी केली. तीत त्या सर्वांना आपले इरादे त्यांनी कमालीच्या स्पष्टपणे कळविले. यापुढे अमेरिकेवर तुम्हाला फारसे अवलंबून राहता येणार नाही अशी ती सुनावणी होती. अमेरिका हा सामर्थ्यशाली देश असल्यामुळे जगातील पाच प्रमुख राष्ट्रांच्या नेत्यांना आपले म्हणणे त्यांनी एकाच दिवशी फोनवर ऐकविले, ही बाब येथे लक्षणीय आहे. इतर देशांच्या पुढाऱ्यांना त्यांचे म्हणणे सांगायला अमेरिकेसह या सर्व देशांना भेटी द्याव्या लागतात व त्यांच्या दरबारात पाणीही भरावे लागते ही बाब लक्षात घेतली की ट्रम्प यांची अहंता व त्यांचा एकूणच तोरा साऱ्यांचा लक्षात यावा. जर्मनी वा जपानला ते गेले नाहीत. त्यांच्या नेत्यांना आपला आदेश त्यांनी साध्या दूरध्वनीवरून ऐकविला.

सामर्थ्यशाली देश आणि धडपडणारी राष्ट्रे यांच्या नेतृत्वाच्या शैलीतला हा फरक लक्षात घेतला तरी ट्रम्प यांचे जगाला भेडसावणे व त्याला जरबेत ठेवण्याचा प्रयत्न करणे हे जगापुढे वाढून आलेले संकट आहे हे साऱ्यांच्या ध्यानात यावे. ट्रम्प यांच्या अहंतेविरुद्ध अमेरिकेसह अनेक देशांतील स्त्रियांनी आजवर मोठे मोर्चे काढले आहेत. यापुढे सारे जगच त्यांच्याविरुद्ध असे उभे होईल याचे संकेत देणारी ही स्थिती आहे. लोकशाही ही मनोवृत्तीही आहे. ती नसलेले नेते जेव्हा सत्तापदावर
येतात तेव्हा अशाच तऱ्हेचे राजकारण जन्माला येणार असते.

Web Title: Dangerous way of trumpasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.