योगी आदित्यनाथ ठरू शकतात मोदींना पर्याय!
By admin | Published: March 28, 2017 12:42 AM2017-03-28T00:42:17+5:302017-03-28T00:42:17+5:30
उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातील भाजपाच्या विजयाने आणि त्यानंतर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री नियुक्त केल्यानंतर
उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातील भाजपाच्या विजयाने आणि त्यानंतर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री नियुक्त केल्यानंतर अनेक टीकाकारांची तोंडेच बंद करून टाकली यात काहीच शंका नाही. टीकाकार अद्याप दोन कोडी सोडवण्यात गुंतले आहेत. पहिले म्हणजे मतांच्या गणिताचे. कित्येक वर्षे उत्तर प्रदेशात जातीवर आधारित राजकारण चालत आले आहे, हे राजकारण भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ४१ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवत कसे काय थांबवले. मतदानाची सूक्ष्म चिकित्सा अजून बाकी आहे; पण ओझरती नजर टाकली तर हे स्पष्ट होते की, भाजपाला उच्चवर्णीय जाती, ओबीसी आणि दलित अशा सर्वांचे समर्थन लाभले आहे, अपवाद फक्त मुस्लीम समुदायाचा आहे. किंवा असेच घडावे यासाठी भाजपाची सर्व व्यूव्हरचना होती. या समुदायाला वेगळे पाडून बिगर-मुस्लीम मते एकत्र आणली गेली आहेत.
मतांचे हे ध्रुवीकरण आणि दृढीकरण काही पहिल्यांदाच घडले आहे असेही नाही. असेच सर्व उत्तर प्रदेशात २०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत घडले होते, त्यावेळी भाजपाने ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या. एकूणच सर्व जातींची मते त्यांनी मिळवली होती, एकूण ७३ टक्के मते भाजपाने मिळवली होती. निवडणूक विश्लेषकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यामागे अनेक गोष्टी होत्या, ज्यात मोदींनी दिलेली प्रगतीची आश्वासने होती. पण विधानसभा निवडणुका या लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळ्या असतात. मोदींनी आर्थिक क्षेत्राविषयी दिलेली आश्वसने अजूनही आकार घेत आहेत; पण कुणीही अशी अपेक्षा केली नव्हती की लोकसभेची पुनरावृत्ती जशीच्या तशी विधानसभेत होईल. म्हणूनच हे कोडे निर्माण होते की, मोदींना त्यांचा लोकसभा निवडणुकीतील करिष्मा तीन वर्षानंतर आणि तेही आर्थिक आघाडीत फारशी समाधानकारक कामगिरी नसताना झालेल्या विधानसभा निवडणुकीत कसा कायम ठेवता आला. गोरखनाथ मठाचे महंत असलेल्या ४५ वर्षीय योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करणे ही आणखी एक आश्चर्याची गोष्ट. त्यामुळेसुद्धा अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. योगी हे काही उत्स्फूर्तपणे समोर आलेले राजकीय नेतृत्व नाही. मतमोजणी नंतर सात दिवस, म्हणजे जोपर्यंत कडव्या हिंदुत्ववादासाठी प्रसिद्ध असलेल्या योगींना अनपेक्षितपणे मुख्यमंत्री म्हणून घोषित करेपर्यंत सर्व वातावरण शांत होते. या घोषणेमुळे केंद्रात दूरसंचार विभागाचा कारभार असलेले मनोज सिन्हा तसेच उत्तर प्रदेश भाजपाचे प्रमुख व धडाडीचे ओबीसी नेते असलेले केशव प्रसाद मौर्य हे दोघेही योगींच्या नियुक्तीने मागे पडले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नियुक्तीने एक गंभीर शंका निर्माण झाली आहे ती अशी की, या निवडणुकीत खरा करिष्मा कुणाचा होता? काही माध्यमांनी असा निष्कर्ष काढला की याचे सर्व श्रेय केवळ मोदींना जाते. पण मग असे असेल तर मोदींच्या आवडत्या लोकांच्या वर्तुळात नेमके असे काय चालले आहे? (मौर्य यांनी छातीत दुखत असल्याचे सांगून हॉस्पिटलचा रस्ता धरला आहे) तसेच मतमोजणीनंतर निर्णय घेण्यास सात दिवस का लागले? भाजपाचे मार्गदर्शक असलेल्या रा.स्व. संघाविषयी बोलायचे झाले तर आता काही लहान-लहान गट निर्माण झाले आहेत, हे पक्षाला लक्षात घ्यायला हवेत. म्हणूनच एक अंदाज असा लावला जातोय की योगींच्या रूपाने भाजपाने अंधारात केवळ एक मशाल धरली आहे. ‘द ब्रदरहूड इन सॅफरॉन’ या पुस्तकाचे सहलेखक वॉल्टर अँडरसन यांनी हे पुस्तक संघाच्या कार्याविषयी लिहिले आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, संघाचे चरित्रनिर्माण आणि हिंदुत्व हे मोदींच्या तसेच भाजपाच्या राजकीय ध्येयांपेक्षा फार वेगळे आहे. हिंदुत्ववादी कंपूचे प्रमुख म्हणून मोदी मात्र कधीच संघाच्या संपर्क कक्षेच्या बाहेर गेलेले नाहीत. मोदींनी या दरम्यान नवीन; पण धडाकेबाज लोक शोधून काढले आहेत. संघाच्या दृष्टीने भारत हा हिंदुत्वाची सर्वश्रेष्ठता परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांचा समूह आहे. हिंदुत्वाची सर्वश्रेष्ठता बाराव्या शतकात मुहम्मद घोरीच्या आक्र मणानंतर भंग पावली आहे असे संघाचे म्हणणे आहे. वास्तवात असे दिसतेय की, मोदींनी हा इतिहास दहाव्या शतकापासूनच वाचायला सुरुवात केली असावी कारण दहाव्या शतकात गजनीने हल्ला केला होता, म्हणून ते नेहमी बारा शतकांच्या गुलामगिरीविषयी बोलत असतात.
आदित्यनाथ यांची प्रतिमा मोदींप्रमाणेच मुस्लीम विरोधी आहे, याला संघाचे विचारवंत विचारधारा म्हणत असतात. योगी आणि त्यांची हिंदू युवा वाहिनी हे गंगेच्या पूर्व खोऱ्यात भयंकर समजले जातात. लव्ह जिहाद आणि त्याचा परिणाम म्हणून निर्माण झालेली धार्मिक तेढ, त्यात योगी आदित्यनाथ यांनी भर घालत दंगलग्रस्त धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पहिली कृती बेकायदेशीर कत्तलखाने करण्याची, सडकछाप गुंडांचा बंदोबस्त करणे अशी होती. या कृती त्यांच्या आश्वासनाचा भागही असू शकतो. पण अशा आश्वासनांच्या मागे एक तत्त्वज्ञानदेखील आहे. ‘सबका साथ, सबका विकास’चा उदो उदो करताना योगी यांनी आणखी एका धाडशी निर्णयाची घोषणा केली आहे. अशी घोषणा कल्याण सिंह किंवा राजनाथ सिंह यांनीसुद्धा केलेली नाही. जो हिंदू नागरिक कैलास मानसरोवरला भेट देईल त्याला एक लाख रु पये मदत म्हणून देण्याची घोषणा योगींनी केली आहे. त्यांनी नोएडा व गाजियाबाद येथे लखनौच्या हज हाऊसच्या पार्श्वभूमीवर कैलास हाऊस उभे करण्याचीही घोषणा केली आहे. म्हणून दिल्लीत मोदींची आणि लखनौमध्ये योगी यांची भूमिका सारखीच असली तरी राम मंदिर उभे करण्यात उशीर झाला तरी यात आश्चर्य असे काही नाही.
संघ कदाचित हिंदुत्वाच्या घोडदौडीला टप्प्यांच्या शर्यतीत ठेवू पाहत आहे. मोदी राजकीयदृष्ट्या हुशार आहेत; पण त्यांचे वय ६५ वर्ष आहे. संघ भविष्यात त्यांच्यासाठी पर्याय शोधतो आहे. म्हणूनच की काय मनोहर पर्रीकर हे मोदींच्या मंत्रिमंडळातले पोश्टर बॉय होते. त्यांचा सुरु वातीचा अतिउत्साह, म्हणजे शंकास्पद पद्धतीचा होता. त्यांनी तस्करांची बोट नष्ट केली; परंतु असे काही चित्र उभे केले की त्यांनी शत्रू राष्ट्राची पाणबुडीच नष्ट केली, हे त्याचेच द्योतक होते. पर्रीकरांकडे मोदी यांच्या इतकी ऊर्जा नव्हती म्हणून त्यांना पणजीला तातडीने परत पाठवून मुख्यमंत्री करण्याची नामुष्की आली होती. आदित्यनाथ हे संघाची नवी निवड आणि मोदी क्रमांक दोन आहेत. हिंदुत्ववादाचे अग्रणी मानले जाणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली संघाची स्थापना केली होती. गांधीजींच्या असहकार आंदोलनादरम्यान कारावासात असताना त्यांचा गांधींच्या अहिंसा तत्त्वावरून विश्वास उडाला होता. शिवाय त्यांना गांधीजींची भारताची कल्पनासुद्धा आवडली नव्हती कारण त्यात मुस्लिमांचा समावेश होता. हेडगेवारांच्या मते मुस्लिमांनी भारतावर आक्रमण करून कोट्यवधी लोकांना इस्लाम धर्मात आणले होते. जर संघाला त्यांच्या विचारांनुसार भारतावरची पकड २०२५ साली त्यांच्या स्थापनेच्या शतकपूर्तीच्या आधी करायची असेल तर त्यांना मोदी क्र मांक दोनची निवड करणे आवश्यक आहे.
हरिष गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )