मनमोहन सिंग आहेत मल्ल्यांचे गॅरेंटर
By admin | Published: May 21, 2016 04:19 PM2016-05-21T16:19:19+5:302016-05-21T16:28:21+5:30
बँकांचे कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्या यांचा गॅरेंटर म्हणून राहिल्याबद्द्ल बँकेने मनमोहन सिंग यांची बँक खाती गोठवली आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
पिलीभीत (उत्तरप्रदेश), दि. 21 - बँकांचे कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्या यांचा गॅरेंटर म्हणून राहिल्याबद्द्ल बँकेने मनमोहन सिंग यांची बँक खाती गोठवली आहेत. पण तुम्ही समजत आहात त्याप्रमाणे हे मनमोहन सिंग माजी पंतप्रधान नसून पिलभीतमधील स्थानिक शेतकरी आहे. या शेतक-याचं नावदेखील मनमोहन सिंग आहे. मनमोहन सिंग यांची बँकिंग सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली असून शेतकरी योजनांचा लाभही थांबवण्यात आला आहे.
मनमोहन सिंग खजुरिया नवीरम गावाचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे आठ एकर जमीन आहे. डिसेंबर 2015 पर्यंत त्यांचं आयुष्य सुखात चालू होतं. बँक ऑफ बडोदामधील स्थानिक शाखेत त्यांची दोन खाती होती. मात्र एक दिवशी मुंबईच्या कार्यालयाने स्थानिक शाखेला सूचना करत मनमोहन सिंग विजय मल्ल्यांचे गॅरेंटर असल्याने त्यांची खाती गोठवण्याचे आदेश दिले.
'हे कसं झालं मला काही माहित नाही. मला विजय मल्ल्या यांच्याबद्दल काहीच माहित नाही. मी त्यांना कधीच भेटलेलो नाही आणि कधी मुंबईलाही गेलेलो नाही. माझी बँक खाती सील करण्यात आली आहेत त्यामुळे मी कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे. माझ पीक मला मजबुरीने कमी पैशांमध्ये खासगी व्यापा-यांना विकावं लागलं. पण त्याची रक्कमही माझ्या खात्यात जमा होत असल्याने त्याचे पैसेही मला मिळू शकत नाहीत', अशी खंत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे.
मनमोहन सिंग यांना इतर कोणतीही बँक नवं खातं खोलण्यास परवानगी देत नाही आहे. 'हे प्रकरण अद्याप माझ्यापर्यंत आलेलं नाही. माझ्याकडे लेखी तक्रार आल्यास मी यामध्ये लक्ष घालेन' असं जिल्हा दंडाधिकारी मासूम अली सरवर बोलले आहेत.
'मनमोहन सिंग गेल्या 8 वर्षांपासून आमच्या बँकेतील दोन्ही खाती वापरत आहे. त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही. आम्ही मुंबई कार्यालयाला मनमोहन सिंग यांची बाजू मांडणारा अहवाल पाठवला आहे मात्र आम्हाला अद्यार उत्तर मिळालेलं नाही', अशी माहिती बँक ऑफ इंडियाचे ब्रांच मॅनेजर मंगेराम यांनी दिली आहे.