गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तोडफोड!
By Admin | Published: July 12, 2017 01:33 AM2017-07-12T01:33:48+5:302017-07-12T01:33:48+5:30
ग्रामस्थांचा संताप अनावर : वाहन चालकासह तिघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
जऊळका रेल्वे : वरदरी (बु.) येथून बार्शिटाकळीकडे सहा गायी घेवून जाणाऱ्या वाहनास कवरदरी-मालेगाव व किन्ही येथील गावकऱ्यांनी पकडून जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनच्या स्वाधीन केले. तत्पूर्वी संतापलेल्या ग्रामस्थांनी गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तोडफोड केली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.
वरदरी बु. येथुन कवरदरीमार्गे बार्शिटाकळीकडे जाणाऱ्या बेलोरा पिकअप (क्रमांक एम.एच.३७ जे १४७५) वाहनातून सहा गायी घेवून जात होते. दरम्यान, कवरदरी येथील नागरिकांना संशय आल्यामुळे त्यांनी वाहन चालकास वाहन थांबावयास सांगितले; परंतू वाहन न थांबल्यामुळे काही नागरिकांनी मालेगावला फोन करुन माहिती दिल्याने मालेगाव येथील लोकांनी त्या वाहनाला थांबवले असता त्यामध्ये सहा गायी आढळुन आल्या. यावेळी नागरिकांचा संताप अनावर झाल्याने वाहनाच्या काचा व टायर फोडले व पोलिस स्टेशनला माहिती कळवली. पोलिसांनीही घटनास्थळी येवून त्यांना ताब्यात घेतले. या गायी चोरुन कत्तलखान्याकडे जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती. नागरिकांच्या सर्तकामुळे गायींचे प्राण वाचले.
जऊळका पोलिसांनी सहाही गायींना जऊळका रेल्वे येथील गोरक्षणमध्ये ठेवले आहे. या घटनेची फिर्यादी किन्हीराजा पोलिस चौकीचे ज्ञानेश्वर राठोड यांनी दिली असून जऊळका पोलिसांनी याप्रकरणी हरिचंद्र राठोड व सागीर उल्हास खाँ. आणि शे.हारुन शे हमीद अशा तिघांवर कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तोडफोड केल्यामुळे सदर वाहन टॅक्टरमध्ये टाकुन पोलिस स्टेशनला आणण्यात आले. दरम्यान, सदर गायी चोरीच्या आहेत की कुणाच्या मालकीच्या, याचा पोलिस शोध घेत आहेत.