वडिलांच्या झालेल्या अपमानामुळे मंडपातच नवरी मुलीने मोडले लग्न
By Admin | Published: April 23, 2017 09:11 AM2017-04-23T09:11:53+5:302017-04-23T09:49:08+5:30
लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात अशी आपल्याकडे म्हण आहे. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्रच येणे नव्हे तर दोन कुटुंब या नात्याने जोडली जातात.
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 23 - लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात अशी आपल्याकडे म्हण आहे. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्रच येणे नव्हे तर दोन कुटुंब या नात्याने जोडली जातात. कुटुंब जर हे समाजाचं एकक समजलं तर पती आणि पत्नीवर दोन्ही कुटुंबाची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी येऊन पडते. पण लखनऊमध्ये नवरीमुलीने आपल्या वडिलांचा झालेला अपमान पाहून भर मांडवातच लग्नाला नकार दिल्याची घटना घडली आहे.
हुंड्यामुळे अथवा नवरदेवाने मद्य प्राशन केल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे लग्न मोडल्याचे आपण अनेकवेळा ऐकले असेल. भारतात अशा घटना घडू शकतात. माध्यमांच्या वृत्तानुसार, लखनऊपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या कुर्मापूर गावात 14 एप्रिल रोजी एक लग्न होते. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. वऱ्हाडी मंडळी वाजत-गाजत आले होते. त्याचदरम्यान नवरदेवाचा भाऊ आणि नववधूच्या पाहुण्यांमध्ये वाद सुरू झाला. नवरदेवाचा चुलत भाऊ मनोजने दोन रसगुल्ल्यांची मागणी केली. पण नवरीमुलीच्या पाहुण्यांनी रसगुल्ले देण्यास विरोध करत फक्त एकच रसगुल्ला मिळेल, असे म्हटले. त्यानंतर दोन्ही पाहुण्यांमध्ये भांडणास सुरूवात झाली.
दोन्ही पाहुण्यांचा वाद येवढा विकोपाला गेला की, हातातल्या प्लेट्सही एकमेकांकडे फेकून मारण्यात आल्या. जेव्हा ही गोष्ट नवरदेव व नवरीमुलीच्या वडिलांना कळली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी मनोज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नवरीमुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. अखेर हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी हा वाद मिटवून लग्न लावण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा या वादाची माहिती नवरीमुलीला समजली तेव्हा तिने लग्नालाच नकार दिला. आपल्या वडिलांचा झालेला अपमान आणि त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे नवरीमुलीने लग्नासच नकार दिला.