बाळासाहेबांच्या स्मारकाचे जयंतीपूर्वीच होणार लोकार्पण
By admin | Published: January 2, 2017 03:48 AM2017-01-02T03:48:19+5:302017-01-02T03:48:19+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काळा तलाव परिसरात उभ्या राहत असलेल्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे
कल्याण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काळा तलाव परिसरात उभ्या राहत असलेल्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये साकारलेला बाळासाहेबांचा पुतळा रविवारीच कल्याणकडे मार्गस्थ झाला आहे. या पुतळयाचे प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या सीमेवर वाजत गाजत स्वागत होत असल्याने सोमवारी सकाळी ९ वाजता कल्याण-शीळ मार्गावर हा पुतळा पोहोचेल अशी माहिती कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.
२३ जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे. त्यादिवशी राज्यभर भरपूर कार्यक्रम असल्याने तत्पूर्वीच म्हणजे येत्या रविवारी, ८ जानेवारीला या स्मारकाचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाले. बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ कल्याणमध्ये स्मारक उभारावे, असा ठराव केडीएमसीच्या २०१३ च्या महासभेत संमत करण्यात आला. हा प्रस्ताव तत्कालीन सभागृह नेते रवींद्र पाटील यांनी मांडला होता. प्रस्तावित स्मारकासाठी एक कोटी रूपयांची तरतूदही करण्यात आली. स्मारकासंदर्भात केडीएमसीने संकल्पचित्रे मागविली होती. ती चार संस्थांकडून मिळाली. त्यातील शशी प्रभू अॅन्ड असोसिएटस या संस्थेच्या संकल्पचित्राला पसंती देण्यात आली. काळा तलाव परिसरातील एक एकर भूखंडावर बाळासाहेबांचे स्मारक उभे राहत आहे. प्रत्यक्षात कामाला २०१४ मध्ये प्रारंभ झाला.
बाळासाहेबांचा पुतळा कोल्हापुरात शिल्पकार संताजी चौगुले यांनी यांनी साकारला आहे. चार हजार किलो वजनाचा आणि २२ फूट उंच असा हा भव्य पुतळा आहे. काम पूर्ण झाल्याने रविवारी हा पुतळा कोल्हापूर येथून जल्लोषात कल्याणला निघाला आहे.
हा पूर्णाकृती पुतळा आणण्यासाठी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक सुधीर बासरे, माजी नगरसेवक सचिन बासरे आदी कल्याणमधील पदाधिकारी शनिवारीच कोल्हापुरात दाखल झाले. रविवारी सकाळी विधीवत पूजा करून हा पुतळा कल्याणला मार्गस्थ झाला. यावेळी स्थानिक आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते. पुतळा साकारणाऱ्या संताजी चौगुले यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
कल्याणमध्येही पुतळ््याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते चौकाचौकांमध्ये ढोल ताशांच्या गजरात या पुतळयाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. येऊ घातलेली शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकांची लागू होणारी आचारसंहिता, निवडणूक प्रचारात गुंतून पडणारे नेते यांचा विचार करून बाळासाहेबांच्या जयंतीपूर्वीच स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)