साहसी प्रात्यक्षिके, आतषबाजीने फेडले पारणे
By admin | Published: March 28, 2017 05:49 AM2017-03-28T05:49:56+5:302017-03-28T05:49:56+5:30
श्वास रोखून धरायला लावणारी साहसी खेळांची प्रात्यक्षिके, शोभेच्या फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी आणि शहरात
डोंबिवली : श्वास रोखून धरायला लावणारी साहसी खेळांची प्रात्यक्षिके, शोभेच्या फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी आणि शहरात ठिकठिकाणी रेखाटण्यात आलेल्या रांगोळ्या, असे उत्साहाचेवातावरण डोंबिवलीत सोमवारी सायंकाळपासून पाहायला मिळाले. घराघरांमध्येही नववर्ष स्वागताची जोरदार तयारी सुरू होती.
श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष संयोजन समितीतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त सोमवारी भागशाळा मैदानात अनादिरव पथकाने शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. बुलडाण्याहून आलेल्या वरद जोशी या सहा वर्षांच्या मुलाने सादर केलेली प्रात्यक्षिक सर्वांचे आकर्षण ठरली.वरदविनायक ध्वज पथकाने ध्वज नाचवला. गणेश मंदिर पथकानेही शारीरिक कवायती सादर केल्या. या वेळी ढोलवादनाचा नाद भागशाळा मैदानात निनादला. राष्ट्रसेविका समितीची तलवारबाजीची प्रात्यक्षिके पाहून सगळेच थक्क झाले. दुसरीकडे भागशाळा व पाटकर मैदानांवर रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्रीपासूनच घनश्याम गुप्ते, रेल्वे स्थानक, द्वारका हॉटेल, आई बंगला, चार रस्ता, शिवाजी महाराज पुतळ्यानजीक भव्य रांगोळ्या काढण्यास सुरुवात झाली. ‘संस्कारभारती’ने स्वागतयात्रा मार्गावर पायघड्या घातल्या.
गुढीपाडव्याला पहाटे ५.३० वाजता श्री गणेशाची महापूजा व पालखी पूजन होईल. त्यानंतर, पालखी निघेल. सकाळी ६.३० वाजता कान्होजी जेधे मैदान येथून स्वागतयात्रेस प्रारंभ होईल. यंदा पंचागवाचन व गुढीपूजन सकाळी ८.४५ वाजता श्री गणेश मंदिरात होणार आहे. स्वागतयात्रेत ५४ चित्ररथ आणि ७५ संस्था सहभागी होणार आहेत. यंदा ८ नवीन संस्था सहभागी होत आहेत.भागशाळा मैदानापासून स्वागतयात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर, ही यात्रा सुभाषचंद्र बोस पथ, नाना शंकरशेट पथ, घनश्याम गुप्ते पथ, विष्णूनगर पोलीस ठाणे, द्वारका हॉटेल, पूर्व-पश्चिम ओव्हरब्रिज, आई बंगला, गिरनार चौक, चाररस्ता, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, मदन ठाकरे चौक येथे सांगता होईल. (प्रतिनिधी)
मुस्लिमही करणार यात्रेचे स्वागत
डोंबिवलीच्या पश्चिमेला असलेल्या घन:श्याम गुप्ते मार्गावरील मशिदीजवळून सकाळी स्वागतयात्रा जाईल तेव्हा तेथे मुस्लिम समाजाकडून यात्रेचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती आयोजक मंदार कुलकर्णी यांनी दिली. यामुळे स्वागतयात्रेत प्रथमच चांगला पायंडा पडत असल्याचे आणि सामाजिक अभिसरण सुरू होत असल्याचे मतही त्यांनी नोंदविले.