पठाणकोटप्रकरणी पाकने कारवाई करावी
By admin | Published: January 10, 2016 02:12 AM2016-01-10T02:12:04+5:302016-01-10T02:12:04+5:30
दहशतवाद्यांचे जाळे समूळ नष्ट करताना कोणताही भेदभाव न करण्याचे पाकिस्तानने खाजगी आणि जाहीररीत्या दिलेले आश्वासन पाळावे आणि हवाईदलाच्या पठाणकोट येथील
वॉशिंग्टन : दहशतवाद्यांचे जाळे समूळ नष्ट करताना कोणताही भेदभाव न करण्याचे पाकिस्तानने खाजगी आणि जाहीररीत्या दिलेले आश्वासन पाळावे आणि हवाईदलाच्या पठाणकोट येथील तळावरील हल्लेखोरांवर कारवाई करावी, असे स्पष्ट मत अमेरिकेने व्यक्त केले आहे.
पाकिस्तानातील गट आणि लोकांनी हवाईदलाच्या पठाणकोट तळावरील हल्ल्याचा कट रचून त्यानुसार कृती केली, असे भारतीय गुप्तचरांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मुंबई हल्ल्याबाबत (२६/११) कट रचणाऱ्यांना जसे कोणत्या ना कोणत्या लगंड्या सबबी सांगून पाठीशी घातले तसे पठाणकोटबाबत होऊ नये, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले.
पठाणकोट हल्ल्याबाबत आम्ही चौकशी करणार असल्याचे पाकिस्तानने सांगितले असून, ती प्रक्रिया सुरू व्हावी; परंतु जे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे, असेही या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पठाणकोट हल्ल्यानंतरच्या काही दिवसांतच शरीफ सरकारने जी भूमिका घेतली त्याबद्दल या अधिकाऱ्याने समाधान व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानने पूर्वीप्रमाणे टाळाटाळ करू नये
पठाणकोट हल्ल्याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत,
असे पाकिस्तानने जाहीरपणे म्हटले आहे. दहशतवादी गटांबाबत आम्ही कोणताही भेदभाव करणार नाही, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. आता आम्हाला पाकिस्तान बोलल्याप्रमाणे वागतो की नाही, हे बघायचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
पाकिस्तान सरकारने जे म्हटले आहे त्यानुसार त्याला कृती करण्यास वेळ दिला पाहिजे, असे अमेरिकेला वाटते आणि हे नाही तर ते कारण सांगून दहशतवादी गटांवर कारवाई करण्यास यापूर्वी पाकिस्तानने टाळाटाळ केली आहे, तसे यावेळी काही होणार नाही, अशी आम्हाला आशा असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.