भारत पाकमधल्या धरमशालातल्या वर्ल्ड कप सामन्यावर धर्मसंकट
By admin | Published: March 1, 2016 01:28 PM2016-03-01T13:28:51+5:302016-03-01T13:28:51+5:30
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांनीच सुरक्षा व्यवस्थेचं कारण देत हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
सिमला, दि. 3 - टी - 20 वर्ल्ड कपमधला भारत पाकिस्तान यांच्यातला सामना हिमाचल प्रदेशमधल्या धरमशाला येथे 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, खुद्द हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांनीच सुरक्षा व्यवस्थेचं कारण देत हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत व पाकिस्तान या पारंपरिक शत्रूंमधलं मैदानावरचं युद्ध पाहण्याची हौस प्रत्येकाला असते, परंतु पाकिस्तानी खेळाडुंना भारतात खेळू देण्यावरून भारतीय जनमत प्रतिकूल होत असल्याचं दिसत असून आता हिमाचल प्रदेशच्या सरकारनेही सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे.
याआधी केवळ शिवसेनेने भारत पाकिस्तान सामने होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. 1991 वानखेडेचं पिच खोदून शिवसैनिकांनी सामना रद्द करण्यास भाग पाडलं. त्यानंतर याचपद्धतीने शिवसेनेने 1998 मध्ये मुंबईतली कसोटी, 1999मध्ये दिल्लीतला सामना, 2003 मध्ये आग्रा येथला सामना होऊ दिला नव्हता.
आता हिमाचल प्रदेशमध्येही भारत पाक सामना सुरक्षितरीत्या होऊ शकणार नाही अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत आहे. यासंदर्भात त्यांनी बीसीसीआयला पत्र पाठवून हा सामना रद्द करण्याची व अन्यत्र भरवण्याची विनंती केली आहे.
मात्र, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी एक वर्ष आधी या सगळ्या सामन्यांचं नियोजन झालेलं असल्यामुळे ऐनवेळी असा बदल करता येणार नाही अशी भूमिका मांडली आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्रीच सामना सुरक्षित होऊ शकत नाही, असं सांगत आहेत, तर दुसरीकडे ऐनवेळा ठिकाण बदलणं शक्य नसल्याचं बीसीसीआय म्हणत आहे. यामुळे धरमशाला येथील भारत पाक सामन्यावर धर्मसंकट आलं आहे हे मात्र खरं.