दोन भावांनी घडविला हल्ला
By admin | Published: March 24, 2016 02:15 AM2016-03-24T02:15:37+5:302016-03-24T02:15:37+5:30
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये झालेल्या भयंकर बॉम्ब स्फोटांमधील आत्मघातकी हल्लेखोर हे भाऊअसल्याचा दावा करण्यात येत आहे. तर यातील तिसरा संशयित फरार आहे.
ब्रुसेल्स : बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये झालेल्या भयंकर बॉम्ब स्फोटांमधील आत्मघातकी हल्लेखोर हे भाऊअसल्याचा दावा करण्यात येत आहे. तर यातील तिसरा संशयित फरार आहे.
खालिद आणि इब्राहीम अल बक्रोई या दोघांनी स्फोटात स्वत:ला उडवून दिले. पॅरिस हल्ल्यातील मुख्य संशयित अब्देलसलाम याच्याशीही या दोन भावांचा संबंध होता.
पोलीस त्यांचा शोध घेत होते. खालिदने मागील आठवड्यात खोट्या नावाने ब्रुसेल्समध्ये किरायाने घर घेतले होते. पोलिसांनी या ठिकाणावर छापा टाकला होता तेव्हा
पोलिसांना या ठिकाणी अब्देलसलामच्या बोटांचे ठसे मिळाले होते. युरोपातील मोस्ट वाँटेड अब्देलसलाम याला मागील आठवड्यात पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक केली. ही अटक म्हणजे दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील बेल्जियमच्या अभियानाचे मोठे यश मानले जात आहे.
दक्षिण बेल्जियमच्या चार्लेरोई शहरात किरायाने घेतलेल्या घराशीही खालिदचा संबंध आहे. इसिसचे हल्लेखोर त्याच्या घरातून निघाले होते आणि त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी त्यांनी पॅरिसमध्ये हल्ला केला होता. यात १३० जण ठार झाले होते. पोलिसांनी बुधवारी आवाहन करून दोन व्यक्तींबद्दल माहिती मागविली आहे. या दोघांनीच विमानतळावर स्वत:ला उडवून दिले असा दावा केला जात आहे. पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे की, या व्यक्तींना कोणी ओळखते का? यात सीसीटीव्हीतील छायाचित्र दाखविण्यात आले आहे. विमानतळावरील हॉलमधून सुटकेस असलेल्या ट्रॉली घेऊन जाताना हे संशयित छायाचित्रात दिसत आहेत. पोलिसांनी या दोन व्यक्तींचे प्रत्येकी तीन अशी छायचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रात ते किंचित वेगळे दिसतात. तिसऱ्या व्यक्तीने फिकट जॅकेट आणि एक गडद टोपी परिधान केलेली आहे. ही व्यक्ती पळून गेली असावी असा अंदाज लावला जात आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, विमानतळावर स्फोटापूर्वी सीसीटीव्हीत दिसलेल्या तीन व्यक्तीत मध्यभागी दिसणारा व्यक्ती इब्राहीम अल बक्रोई असू शकतो, तर अन्य एक भाऊ (ज्याचे नाव सांगितले नाही) हा मेट्रो स्टेशनवरील हल्ल्यात सहभागी असू शकतो. संशयिताला पकडले, पण... या हल्ल्यातील एक प्रमुख संशयित नजीम लाचराओई याला पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली; पण काही वेळातच बेल्जियमच्या मीडियाने स्पष्ट केले की, अटक करण्यात आलेली व्यक्ती नजीम लाचराओई नाही. अर्थात नजीमच्या अटकेवरून सुरू असलेला हा प्रकार म्हणजे रणनीतीचाच एक भाग असावा असा अंदाज बांधला जात आहे.