मोदींनी सिनेट जिंकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2016 06:25 AM2016-06-09T06:25:39+5:302016-06-09T06:25:39+5:30

दहशतवादापासून संपूर्ण जगाला धोका असून, आमच्या शेजारीच दहशतवादाचे केंद्र आहे.

Modi won the Senate! | मोदींनी सिनेट जिंकली!

मोदींनी सिनेट जिंकली!

Next


वॉशिंग्टन : दहशतवादापासून संपूर्ण जगाला धोका असून, आमच्या शेजारीच दहशतवादाचे केंद्र आहे. राजकीय स्वार्थासाठी दहशतवादाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे, असा थेट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाकिस्तानचे नाव न घेता हल्ला चढविला.
अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे बुधवारी भाषण करताना त्यांनी भारताची दहशतवादाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आज जगालाच दहशतवादापासून गंभीर धोका आहे. मात्र काही देश राजकीय स्वार्थासाठी दहशतवादाचा वापर करीत आहेत. दहशतवाद्यांना काही देशांत पोसले जात आहे. त्यांच्यावर आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी मिळूनच दहशतवादाचा बिमोड करायला हवा.
भारतीय वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता मोदी यांच्या भाषणास प्रारंभ
झाला. त्यांनी मिस्टर स्पीकर या शब्दांनी भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी सिनेट सदस्यांनी उभे राहून टाळ््यांचा कडकडाट करत मोदींचे स्वागत केले. मोदींनी हात हलवून सर्वांना अभिवादन करत त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला.
मोदी सुरुवातीला भारत आणि भारतीय संस्कृती याविषयी बोलले. त्यानंतर सुमारे पाऊण तासांच्या भाषणात त्यांनी उभय देशातील संबंध, भारताची प्रगती यासह अनेक मुद्यांना स्पर्श केला. भारत-अमेरिकेच्या संबंधांची वीण उलगडताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाचा उल्लेख केला. मार्टिन ल्युथर किंग यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीपासून प्रेरणा घेतली होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अमेरिकी राज्यघटनेचा प्रभाव होता, असे त्यांनी सांगितले. दहशतवादाला (पान १२ वर)(पान १ वरून) धर्म नसतो किंवा चांगला वा वाईट असा दहशतवादही नसतो, असे स्पष्ट करून दहशतवाद, सायबर गुन्ह्यांचे मोठे आव्हान संपूर्ण जगासमोर उभे असल्याचे मोदी यांनी सांगितले.
मोदी यांनी दहशतवादापासून असलेल्या धोक्याचा उहापोह केला. त्यात त्यांनी लष्कर-ए-तोएबा, इसिस यासारख्या संघटनांनी चालविलेल्या दहशतवादी कारवायांचा उल्लेख करून भारत हा उपखंडात सर्व आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज असल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानबद्दल अमेरिकेने स्वीकारलेल्या भूमिकेची प्रशंसाही केली.
दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपले नागरिक आणि सैनिक गमावले आहेत. मुंबई हल्ल्याच्या वेळी अमेरिका भारताच्या बाजूने उभा राहिला. अमेरिकेची ही साथ भारत कधीही विसरणार नाही, असेही त्यांनी सांगितले. भारत-अमेरिका संबंध प्रगतीशिल भविष्याचा पाया असून दोन्ही देशातील युती आशियापासून आफ्रिका आणि हिंद महासागरापासून प्रशांत महासागरापर्यंत शांतता,
समृद्धी आणि स्थैर्याची वाहक बनू शकते. ही युती वाणिज्याचे
सागरी मार्ग आणि सागरातील वाहतुकीच्या स्वातंत्र्य अबाधित राखू शकते. भारत हिंद महासागरात आपली जबाबदारी पार पाडत आहे, असेही मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)




>वाक्यागणिक टाळ्या आणि अभिवादन
मोदी यांच्या भाषणात वाक्यागणिक टाळ्या वाजवून आणि उभे राहून सिनेट सदस्य त्यांना उस्फूर्त प्रतिसाद देत होते. मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र असल्याचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले होते. त्याचाच प्रत्यय आज अणुकराराच्या स्वरूपात दिसत आहे. आज अणुकरार वास्तविकता बनला आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांनी मानवतेसाठी बलिदान दिले आहे. विविधतेत एकता हेच दोन्ही देशांच्या विकासाचे समान सूत्र आहे. प्रत्येकाला समान अधिकार हा दोन्ही देशांचा समान धागा आहे, असे ते म्हणाले.
>सन्माननीय पंतप्रधान
अमेरिकेच्या संसदेत संयुक्त बैठकीत भाषण करणारे नरेंद्र मोदी भारताचे पाचवे पंतप्रधान ठरले. यापूर्वी राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग या पंतप्रधानांना हा सन्मान मिळाला होता.
>२०२२ पर्यंत भारत
आर्थिकदृष्ट्या सक्षम
च्लोकशाहीवरील विश्वासानेच दोन्ही देशांना जोडले आहे. उभय देशातील विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याने प्रश्न सुटतात, रोजगार निर्मिती होते असे मोदी यांनी सांगितले. भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिकेसोबत आहे. याकडे लक्ष्य वेधून ते म्हणाले की, अमेरिकेत सीईओ, शास्त्रज्ञ, डॉक्टर, अंतराळवीर भारतीय आहेत.
च्२०२२ पर्यंत भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम देश बनेल असे सांगून ते म्हणाले की, भारत सध्या आर्थिक, सामाजिक बदलातून वाटचाल करीत आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक गावात इंटरनेट उपलब्ध होईल. १०० स्मार्ट शहरे स्थापन करण्यास सरकार कटीबद्ध आहेत, असे सांगत उभय देशातील आर्थिक संबंधाचा त्यांनी आढावा घेतला.
>2008

मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, त्यावेळी अमेरिकेने भारताला केलेली मदत आम्ही विसरू शकत नाही. अमेरिकेने वेळोवेळी भारताला अडचणीच्या वेळी मदत केली आहे. २१ व्या शतकात जेवढ्या मोठ्या संधी आहेत, तेव्हढीच मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
>तीन कोटींना फायदा
२१ जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या बाबतचा प्रस्ताव नरेंद्र मोदी यांनीच संयुक्त राष्ट्रांत मांडला होता. संयुक्त राष्ट्रांनी लगोलग मंजुरीही दिली. याचा उल्लेख मोदी यांनी आपल्या या भाषणात केला. भारतीय योगाचा अमेरिकेवर मोठा प्रभाव असून तीन कोटी अमेरिकन नागरिकांना त्याचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या या प्राचीन आरोग्यविषयक ठेव्यावर भारताने कधीही बौद्धीक संपदेचा दावा केलेला नाही, असे गंमतीने म्हटले.

Web Title: Modi won the Senate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.