अनेक माध्यमांना व्हाइट हाऊसची बंदी
By admin | Published: February 25, 2017 11:43 PM2017-02-25T23:43:30+5:302017-02-25T23:43:30+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बातम्या देण्याचा आरोप असलेल्या माध्यम संस्थांना व्हाइट हाऊसमधील विस्तारित पत्रकार परिषदेत प्रवेश नाकारण्यात आल्याने
वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बातम्या देण्याचा आरोप असलेल्या माध्यम संस्थांना व्हाइट हाऊसमधील विस्तारित पत्रकार परिषदेत प्रवेश नाकारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रवेश नाकारण्यात आलेल्या माध्यम संस्थांत न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन आणि बीबीसी यासारख्या संस्थांचा समावेश आहे.
वार्षिक कंझर्वेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसार माध्यमांवर जोरदार टीका केल्यानंतर काहीच तासांत व्हाइट हाऊसने टीकाकार माध्यम संस्थांना पत्रपरिषदेत प्रवेश नाकारला. औपचारिक विस्तारित पत्रकार परिषदेला (आॅफ कॅमेरा एक्स्टेंडेड प्रेस गॅगल) व्हाइट हाऊसकडून मोजक्या माध्यम संस्थांना निमंत्रणे पाठविण्यात आली होती. न्यूयॉर्क टाइम्स, लॉस एंजेलिस टाइम्स, पॉलिटिको, बझफीड, बीबीसी, गार्डियन इ. अनेक मान्यवर संस्थांना निमंत्रणे पाठविण्यात आली नव्हती. प्रेस सचिव सीन स्पाइसर यांच्या कार्यालयात ही पत्रपरिषद झाली.
व्हाइट हाऊसकडून दररोज आॅनकॅमेरा पत्रकार परिषद घेतली जाते. तिला फाटा देऊन ही आॅफ कॅमेरा पत्रपरिषद घेण्यात आली. निमंत्रण नसलेल्या माध्यम संस्थांचे प्रतिनिधी स्पाइसर यांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांना बाहेरच रोखण्यात आले.
या निर्णयाच्या समर्थनासाठी
ट्रम्प प्रशासनाच्या प्रवक्त्या सारा
सँडर्स यांनी एका निवेदनात म्हटले
की, सर्वांच्या सहभागासाठी मुख्य पत्रकार परिषद असतेच. ही निमंत्रितांची प्रेस कॉन्फरन्स
होती. स्पाइसर यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, खोट्या बातम्यांचा ट्रम्प प्रशासन कायमच प्रतिकार करत राहील.
तत्पूर्वी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही माध्यमांवर प्रखर टीका केली. त्यांनी म्हटले की, बातमीदार खोट्या बातम्या तयार करतात. त्यासाठी खोटे स्रोत तयार करतात. मी मीडियाच्या विरोधात नाही. खोट्या बातम्यांच्या विरोधात आहे. सूत्राच्या हवाल्याने बातम्या देऊ नका. माहिती देणाराचे नाव प्रसार माध्यमांनी जाहीर करायला हवे. (वृत्तसंस्था)
अन अमेरिकन!
सीएनएनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, आम्ही आमचे काम करीत राहू. न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या संपादकीयमध्ये म्हटले की, हा लोकशाहीचा अवमान आहे.
वॉशिंग्टन पोस्टचे कार्यकारी संपादक मार्टिन बॅरन यांनी म्हटले की, व्हाइट हाऊसला प्रसार माध्यमांची किंमत नाही. हे ‘अन-अमेरिकन’ (अमेरिकाविरोधी) आहे.